झुडपात दबा धरून बसलेल्या 20 जणांच्या टोळक्याने कारला घेरले; खर्डीत माजी सरपंचावर दगडाने हल्ला
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना आता खडींतही माजी सरपंचावर 20 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कारने जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या टोळक्याने अचानक त्यांच्या गाडीवर दगडाने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी उघडा यांना गाडीतून फरफटत बाहेर काढत हॉकी स्टिकने मारहाण करत पायावरही दांडक्यांचे घाव घातले. एका हत्या प्रकरणात साक्षीदार राहिल्यानेच हा हल्ला झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून उघडा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खर्डी विभागातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्त कारने सकाळी 10 वाजता घराबाहेर पडले. गायधरा गावाजवळील शिरोळ गायधरा मार्गावर त्यांची कार आली असता झुडपातून अचानक त्यांच्या गाडीवर दगडांचा मारा सुरू झाला. त्यामुळे घाबरलेल्या उघडा यांनी करकचून ब्रेक दाबताच झुडपात लपलेल्या टोळक्याने धाव घेत त्यांना गाडीतून फरफटत बाहेर काढले. हॉकी स्टिक तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत.
हा हल्ला झाल्याची माहिती मिळताच अजनुप गावातील गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेत उघडा यांना तत्काळ शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन्ही पाय तुटल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी उघडा यांना तत्काळ ठाणे येथे हलवण्यास सांगितले. सध्या त्यांच्यावर ठाणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
संतप्त नातेवाईकांची पोलीस ठाण्यावर धडक
घटनेनंतर हल्लेखोर जंगलात पसार झाल्याचे उघडा यांनी सांगितले. मात्र हा हल्ला सुनियोजित कट असल्याचा आरोप करण्यात येत असून एका हत्या प्रकरणात उघडा हे साक्षीदार असल्यानेच त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान घटनेला 24 तास उलटले तरी आरोपींचा मागमूस लागलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर धडक देत आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List