CRPF जवानांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवणाऱ्या पत्रकाराची निर्घृण हत्या, सेप्टिक टॅंकमध्ये आढळला मृतदेह
नक्षली भागातील कारवाया जीव धोक्यात घालून कव्हर करणारा आणि 2021 मध्ये सीआरपीएफ जवानांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा छत्तीसगडचा तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर (वय – 33) याची निर्घृण हत्या करण्यात आली. एका कंत्राटदाराच्या घरामागे असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुकेश चंद्राकार याने रस्ते घोटाळ्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती. तेव्हापासून त्याला धमक्या मिळत होत्या. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तो बेपत्ता झाला. बेपत्ता झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर 3 जानेवारी रोजी एका कंत्राटदाराच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळला.
सेप्टिक टँक चारही बाजुने सिमेंट काँक्रीट लावून बंद केलेली होती. आरोपींनी मृतदेह लपवण्यासाठी ही शाळा केल्याचे समोर आले असून पोलीस आणि एफएसएल पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. काही संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मुकेशने प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यानंतर झालेली हत्या याचा काही संबंध आहे का याचाही पोलीस तपास करत आहे.
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक तरुण मुकेशला घरातून आपल्यासोबत घेऊन गेला होता. तेव्हापासून त्याला मोबाईल बंद होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळला, असे मुकेशच्या कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. बीजापूरचा तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर याच्या हत्येचे वृत्त दु:खद आहे. यामुळे समाजाची आणि पत्रकारितेचीही हानी झाली आहे. मुकेशच्या हत्याकांडात सहभागी दोषींना सोडणार नाही. त्यांना लवकरच अटक करून कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले.
कंत्राटदारावर संशय
मुकेश चंद्राकर याचा भाऊ युकेश चंद्राकर हा देखील पत्रकार आहे. मुकेशने रस्ता घोटाळ्यावर एक बातमी प्रसिद्ध केली होती. तेव्हापासून त्याला धमकी मिळत होती. पोलिसांना कंत्राटदार सुरेश चंद्राकरवर संशय आहे. मुकेशच्या हत्येपासून सुरेश चंद्राकर कुटुंबासह फरार झाला आहे. त्याचा धाकटा भाऊही दिल्लीला पळाला असून त्याची चारचाकी गाडी रायपूर विमानतळावर आढळली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
कोण होता मुकेश चंद्राकर?
– 2021 मध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांचे अपहरण केले होते. या जवानांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यात मुकेशने महत्त्वाची भूमिका निभावली होती. छत्तीसगड पोलिसांनीही त्याचे कौतुक केले होते. सीआरपीएफ कमांडो राकेश्वर सिंग मन्हास याच्या सुटकेचे क्षेय त्याला देण्यात आले होते.
– बस्तर भागात नक्षली हल्ले, चकमक आणि इतर महत्त्वाचे मुद्दे तो कव्हर करायचा.
– गेल्या दशकभरापासून मुकेश पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होता. राष्ट्रीय चॅनेलसाठी तो स्ट्रिंजरचे काम करायचा. तसेच त्याचे स्वत:चे बस्तर जंक्शन नावाचे युट्यूब चॅनेलही होते. तिथे 1,59,000 सबस्क्रायबर्स आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List