परदेशी मॉडेल असल्याचे सांगत 700 मुलींशी मैत्री, मग ब्लॅकमेल करून पैसे उकळले; पोलिसांकडून आरोपीला अटक
तब्बल 700 मुलींशी ऑनलाईन अॅपद्वारे मैत्री करुन त्यांना ब्लॅकमेल करून लुटणाऱ्या तरुणाच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तुषार बिष्ट असे आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील स्कूल ब्लॉक परिसरात राहतो. तुषार एका कंपनीत काम करत होता. परदेशी मॉडेल असल्याचे सांगत तो मुलींशी मैत्री करायचा. मग त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ मागायचा. हे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
आरोपीने एक वर्च्युअल आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर मिळवला. या नंबरचा वापर करून त्याने बंबल, स्नॅपचॅट आणि अन्य अॅपवर फेक प्रोफाईल बनवले. मुलींना आकर्षित करण्यासाठी त्याने एका ब्राझिलच्या मॉडेलचा फोटो प्रोफाईलला लावला होता.
आरोपी 18 ते 30 वर्ष वयोगटातील महिला आणि मुलींना टार्गेट करायचा. आधी त्यांच्याशी मैत्री करायचा. संवादादरम्यान तो मुलींना आपण एका प्रोजेक्टनिमित्त भारतात आल्याचे सांगायचा. त्यानंतर त्यांच्याशी मैत्री वाढवून त्यांच्याकडे खासगी फोटो मागवायचा. मग त्यांचे खासगी फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
दिल्ली युनिवर्सिटीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला. पोलिसांच्या एका पथकाने आरोपीचा तपास सुरू केला असता तांत्रिक पुराव्यावरून त्याचे तुषार बिष्ट असल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी त्याचा पत्ता शोधून त्याला अटक केली.
बंबलवर 500 हून अधिक आणि स्नॅपचॅटवर 200 हून अधिक मुलींशी मैत्री केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून पीडितांचा आक्षेपार्ह डेटा आणि वर्च्युअल आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरसह विविध बँकांचे 13 क्रेडिट कार्ड जप्त केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List