अपेक्षित खाते न मिळाल्याने मंत्री भरणे घेईनात पदभार, महायुतीतील नाराजीनाट्य अद्याप सुरूच
राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचे खातेवाटप होऊन आठवडा उलटला तरी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अद्यपही पदभार स्वीकारलेला नाही. अपेक्षित खाते मिळाले नसल्याने भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ते विदेशात निघून गेल्याची सूत्रांची माहिती आहे.
महायुतीमधील घटक पक्षात सुरू असलेले नाराजीनाट्य संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. या ना त्या कारणावरून नाराजी पुढे येत आहे. त्यामुळे तीन घटक पक्षांची नाराजी दूर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीदेखील बहुतांश मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारून दालने ताब्यात घेतली. आढावा बैठक घेऊन कामकाज सुरू केल्याचे दर्शन घडवले.
भरणे हे क्रीडा व युवक कल्याण खात्यावर फारसे खूश नाहीत. ते नाराज असल्याने त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला नाही. ते सध्या नॉट रिचेबल असल्याचे समजते. भरणे सहकुटुंब परदेशात गेले आहेत. ते मंगळवारी येतील, अशी माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
सुनील शेळकेही नाराज
मंत्रीपदासाठी पुणे जिह्यातून अजित पवार गटाचे अनेक आमदार इच्छुक होते. यामध्ये मावळ तालुक्यातून सुनील शेळके आणि हडपसरमधून चेतन तुपे यांचीदेखील नावे चर्चेत होती. तुपे यांना अजित पवार गटाच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी नेमण्यात आले आहे, तर शेळके यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे तेदेखील नाराज आहेत. अशा वेळी भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळूनदेखील ते अपेक्षित खाते न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चेवर अजित पवार गटामधूनदेखील उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List