लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; पाच ठार, 27 जखमी
लग्नाच्या वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात उलटून पाचजण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून त्यात 27 जण जखमी झाले आहेत. जखमींना माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.
पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला अपघात झाल्याने संपूर्ण सोहळ्यावर दुःखाची छाया पसरली. आज सकाळी पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब महाड तालुक्यातील बीरवाडी येथे लग्नसोहळ्यासाठी पर्पल ट्रव्हल्सच्या बसने जात होते. बसमध्ये 35 हून अधिक वऱ्हाडी होते. सकाळी 9.50 च्या सुमारास ही बस माणगावकडे येत असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉइंटजवळ एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. जोरदार आवाज आल्याने बसमधील प्रवासी अक्षरशः हादरून गेले. क्षणभर काय झाले हे समजेना. हा अपघात एवढा भयंकर होता की, त्यात पाचजण जागीच ठार झाले. संगीता जाधव, गौरव दराडे, शिल्पा पवार, वंदना जाधव व आणखी एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
ताम्हिणी घाटात झालेल्या अपघाताचे वृत्त समजताच माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे हे आपल्या रेस्क्यू टीमसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलीस व अन्य स्वयंसेवकांच्या मदतीने जखमींना माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवरदेव आधीच निघाल्याने लग्नसोहळा साधेपणाने
महाडमध्ये संध्याकाळी पाचचा मुहूर्त असल्याने पुण्याच्या लोहगाव येथील जाधव कुटुंबातील नवरदेव एका खासगी कारने निवडक नातेवाईकांसह लवकरच घरातून निघाला होता. बिरवाडी येथे नवरदेव व परिवारातील काही सदस्य लग्नसोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले. मात्र त्यांना अपघाताची बातमी समजताच शोककळा पसरली. मुहूर्ताआधीच अत्यंत साधेपणाने लग्न लावण्यात आले. त्यानंतर लगेच नवरदेवाने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी आप्तेष्टांची विचारपूस केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List