‘कूपर’मधील 570 रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम; तातडीने भरती करण्याची कामगार सेनेची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात 1290 शेड्युल पदांपैकी तब्बल 570 म्हणजेच 47 टक्के पदे रिक्त आहेत. याचा मोठा परिणाम रुग्ण सेवेवर होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवरही ताण येत आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरून रुग्ण सेवा सुरळीत करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे करण्यात आली आहे.
रिक्त पदे भरण्याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष संजय बापेरकर यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पालिकेच्या पार्ले येथील कूपर रुग्णालयात रचना व कार्यपद्धती विभागाने सखोल अभ्यास करून विभाग, रुग्ण खाटा इत्यादी विचारात घेऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांची शेड्युल पदे किती असावीत याची निश्चिती केली होती. सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे मागील काही वर्षांपासून रिक्त होणाऱ्या पदांची भरती करण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांमध्ये नवनवीन विभाग सुरू करण्यात आले, तथापी त्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध करून दिले गेले नाहीत. यामुळे रुग्णालयाच्या एकूण 1290 शेडय़ुल्ड पदांपैकी तब्बल 570 म्हणजे 43 टक्के पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहेत.
अशी आहे पदांची स्थिती
प्रशासकीय कर्मचारी ः एकूण पदे 80 – रिक्त पदे 46
वैद्यकीय कर्मचारी ः एकूण पदे 309 – रिक्त पदे 149
सहवैद्यकीय कर्मचारी ः एकूण पदे 121 – रिक्त पदे 74
परिचारिका ः एकूण पदे 314 – रिक्त पदे 24
कामगार वर्ग ः एकूण पदे 516 – रिक्त पदे 277
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List