कल्याण पोलिसांनी वाचवले 26 विद्यार्थ्यांचे प्राण, तर्राट चालकांची बस वेळीच थांबवल्याने मोठा अपघात टळला
कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण बचावले आहेत. फुटबॉल स्पर्धेसाठी उल्हासनगरच्या जग्गू फुटबॉल अकॅडमीतील मुले एका खासगी बसने जात होती. मात्र टल्ली चालकामुळे ही बस हेलकावे घेत जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी लागलीच या बसला थांबवत तर्राट चालकाला ताब्यात घेतले. त्याची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट घेतली असता तो प्रचंड दारू प्यायल्याचे लक्षात आले. ही गाडी पोलिसांच्या हाती लागली नसती तर कदाचित मोठा अपघात झाला असता असा संताप पालकांनी व्यक्त केला आहे.
उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील 26 विद्यार्थी विरारच्या ग्लोबल स्कूल येथे फुटबॉल स्पर्धेसाठी एका खासगी बसमधून निघाले होते. बसने वालधुनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात प्रवेश केला. यावेळी बस वेडीवाकडी जात असल्याचे वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आले, कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस पाटील यांनी तत्काळ ही बस थांबवून तपासणी केली. त्यावेळी बसचालक सुरेंद्र प्रसाद गौतम हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. ब्रेथ अॅनालायझर चाचणीतही सिद्ध झाले. वाहतूक पोलिसांनी सदर बस जप्त केली असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या बसचालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कर्तव्यदक्ष सुरेश पाटील यांचे कौतुक
बसचालकाला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मोठा अपघात टळला आणि 26 शाळकरी विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. पोलीस सुरेश पाटील यांच्या त्वरित निर्णयक्षमतेमुळेच हा संभाव्य अपघात रोखता आला. कल्याण आणि डोंबिवलीकरांनी वाहतूक पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे.
बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बस जप्त करण्यात आली आहे. टळला. बसचालकावर दंड ठोठावण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
■ राजेश शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कल्याण.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List