शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना रोखले, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा विचारला जाब
भाषावार प्रांतरचनेपासून कर्नाटकात जबरदस्तीने घुसडलेल्या मराठी भाषिकांवर सीमाभागात सातत्याने अत्याचार होत आहेत. बेळगाव येथे सुरू झालेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनास लोकशाही मार्गाने विरोध करणाऱया मराठी भाषिकांचा महामेळावा दडपून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांना अटक करणाऱया कानडी सरकारचा सर्वत्र निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील भाजपच्या माजी मंत्र्यांना अडवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी धारेवर धरत मराठी भाषिकांवर होणाऱया अत्याचाराचा जाब विचारला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, मराठी भाषिकांच्या भावना कर्नाटकातील विधिमंडळापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन कर्नाटकच्या या आमदारांनी दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे हिवाळी अधिवेशन सध्या बेळगाव येथे सुरू आहे. मात्र, बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी या अधिवेशनाला विरोध केला आहे. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून निघालेल्या शिवसैनिकांनाही कर्नाटक, महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक सीमेजवळील कोगनोळी टोलनाक्याजवळ अडवले होते. आज कर्नाटकचे माजी मंत्री आमदार प्रभू चव्हाण आणि आमदार सुनील कुमार हे करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार तसेच सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांनी त्यांना रोखून धरत मराठी भाषिकांवरील अन्यायाचा जाब विचारला.
कर्नाटक सरकार जुलमी पद्धतीने वागत आहे. महाराष्ट्रातही बेळगावसह कर्नाटकातील अनेक लोक राहतात, याचे भानही ठेवावे, असा इशारा उपनेते संजय पवार यांनी दिला. तर, कोल्हापुरात कर्नाटकच्या दडपशाहीला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशारा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिला. यावेळी मराठी भाषिकांच्या भावना विधिमंडळापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List