मारकडवाडीच्या घटनेवर सरकार हुकूमशाही करत असल्याचे दिसते; EVM बाबत निवडणूक आयोगाने शंकांचे निरसन करावे
ईव्हीएम मशीनबाबत सर्वसामान्य नागरिकांनाही विश्वास दिसत नाही. जगात सर्वत्र बॅलेट पेपरवर निवडणुका होत असताना देशात ईव्हीएमवर निवडणुकांचा आग्रह का धरला जात आहे? सद्यपरिस्थितीत ईव्हीएमबाबत अनेक शंका-कुशंका असून, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची शंभर टक्के फेरमोजणी केल्यास सत्य समोर येईल. निवडणूक आयोग व सरकारने याबाबत पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. मात्र, याउलट सरकार हुकूमशाहीचा अवलंब करत असल्याचे मारकडवाडीच्या घटनेवर दिसून येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली.
आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवारपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत अनेक शंका आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर माझ्यासह अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट शंभर टक्के मोजावे, अशी आमची मागणी आहे. दोन्हींचा आकडा जुळला तर शंकेला बावच राहणार नाही.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यापुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. याबाबत आम्ही देशभर आवाज उठवणार आहोत. विधानसभा निवडणुकीतील निकाल अनपेक्षित असला तरी तो मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जगात सर्वत्र बॅलेट पेपरवर निवडणुका होत असताना आपल्याकडे ईव्हीएमचा अवलंब करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसने देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ईव्हीएमबाबत निश्चित काही शंका आहेत. या शंकांचे निरसन निवडणूक आयोग व सरकारने करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींकडून ईव्हीएम मशिनबाबत असणाऱ्या गैरसमजांचे निरसन करून सत्य समोर आणण्याची गरज आहे. मात्र, निवडणूक आयोग व सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत हुकूमशाही लादत असल्याचे मारकडवाडीच्या घटनेवरून दिसून येत आहे.
मारकडवाडीत ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली होती. हा त्यांचा अधिकार होता. मात्र, प्रशासनाने दबाव आणून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले. ब्रिटिशांच्या राजवटीसारखे हे सरकार वागत आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी कोणता कायदा मोडला, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. निवडणूक आयोग खरोखर पारदर्शक निवडणुका घेत आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. लोकांचा विश्वास या निवडणुकांवर नसल्याचे दिसत आहे. ईव्हीएममध्ये बाहेरून बदल करता येणार नाही. मात्र, सॉफ्टवेअरमधील बदल आपण नाकारू शकत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चंद्रचूड यांच्याकडून लोकशाहीचा खून
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याबद्दल आम्हाला आदर असला तरी शिवसेना व राष्ट्रवादीच्या हक्काबाबत सुनावणी पुढे ढकलत अडीच वर्षे बेकायदेशीर सरकार चालवण्यास एकप्रकारे त्यांनी मदत केली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबला नसता तर राज्यात आज वेगळे चित्र दिसले असते. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यास सहकार्य केले आहे. न्यायपालिकेवरही वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचे काम गेल्या काही वर्षांत भाजपकडून होत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
सरकारला धारेवर धरणार
केंद्रात व राज्यात प्रदीर्घ काळ काम केल्याने आम्ही विकासकामांत कुठे कमी पडलो असे वाटत नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेचाही फारसा प्रभाव दिसत नाही. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला आहे. काँग्रेसने पराभवाची कारणमिमांसा केली आहे. अनेक मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडला आहे. गैरमार्गांचा या निवडणुकीत वापर झाला हे निवडणूक आयोगाचे अपयश आहे. सामान्य माणूस आता निवडणूक लढवू शकत नाही. आम्ही पराभव मान्य केला असून, सध्या आमच्याकडे कोणतेही पद नसले तरी आम्ही नव्याने पक्षबांधणी करून सरकारला धारेवर धरणार आहे. राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून, अबू आझमींनी का भूमिका घेतली, ते कळून आले नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List