खातेवाटप जाहीर, आता पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच, मिंधे – अजित पवार गट आमनेसामने
विधानसभा निवडणुकीत प्रचंड मिळूनही महायुती सरकारचा मुख्यमंत्री ठरण्यास खूप वेळ गेला. यानंतर तब्बल 23 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि आता बिनखात्याच्या मंत्र्यांना 8 दिवसांनी खातं देण्यात आलं. या खातेवाटपात मिंधेंच्या हाती निराशाच लागली आहे. गृह खातं मिळावं म्हणून मिंधे अडून बसले होते. मात्र अखेर हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच कायम ठेवलं आहे. तर अर्थ खाते पुन्हा अजित पवार यांना मिळालं आहे. तर गृह आणि अर्थ खात्याच्या तुलनेत कमी वजनदार असलेलं तिसऱ्या नंबरचं नगरविकास, गृहनिर्माण खातं मिंधेंकडे कायम आहे. यातच आता महायुतीत पालकमंत्रीपदावरुन रस्सीखे सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
शनिवारी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा दावा माध्यमांशी बोलताना केला आहे. तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी मिंधे गट आणि अजित पवार गटात स्पर्धा असल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे याआधी येथील पालकमंत्रीपद होतं. मात्र आता मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले हेही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे.
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार?
यातच बीडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखे पाहायला मिळू शकते. येथून भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे पाल्कमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, महायुती पालकमंत्रीपदे लवकरच जाहीर करणार की, यालाही दिरंगाई होणार, हे पाहावं लागले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List