Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा तापला, महाविकास आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या त्या वक्तव्याने ठाकरे गटाची पुन्हा कोंडी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले आहे. आज राहुल गांधी यांच्या वक्तव्यांनी सभागृहात एकच हंगामा झाला. तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हटले. मी एकदा माझी आजी इंदिरा गांधी यांना सावरकर यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी सावरकर हे इंग्रजांना मिळाले होते, अशी माहिती दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्ष नेते आणि इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल यांच्या या नवीन वक्तव्याने पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा रंगली आहे.
सावरकरांविषयी राहुल यांचे वक्तव्य काय?
सावरकर हे मनुस्मृतीला मानत होते. ही भूमिका घटनेच्या एकदम विरोधात आहे. सावरकर यांना संविधानात कधीच भारतीयत्व दिसले नाही. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंदिरा गांधी यांच्या एका पत्राचा उल्लेख केला आणि त्यांनी स्वांतत्र्यवीर सावरकरांना देशभक्त म्हटल्याचे सांगीतले. मग तुम्ही तुमच्या आजीला घटनाविरोधी म्हणणार का? असा सवाल शिंदे यांनी केला.
त्याला राहुल गांधी यांनी उत्तर दिले. आंदोलन काळात सर्वच लोक तुरूंगात गेले. पण सावरकर हे तडजोड करणारे निघाले. त्यांनी घाबरून इंग्रजांची माफी मागीतली. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हंगामा सुरू झाला. काँग्रेस आणि भाजपाच्या सदस्यांनी एकच गोंधळ सुरू केला.
दोन वर्षानंतर पुन्हा सावरकरांचा मुद्दा
2022 मध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेदरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांना माफीवीर म्हटले. त्यांनी त्याविषयीचे कागदपत्रं दाखवत दावे केले. पण त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला. संजय राऊत यांनी या मुद्दावर न बोलण्याचा सल्ला दिला. त्यांना सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी असल्याची आठवण करून दिली.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा रंगली होती. पण अखेरच्या टप्प्यात राहुल गांधी सावरकरांचा मुद्दा पुन्हा सभांमधून उगाळणार नाहीत, त्याची चर्चा करणार नाहीत, असा आग्रह ठाकरे गटाने घेतला. त्याला एकप्रकारे मूक संमती मिळाल्याचे दिसले. मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी हा मुद्दा समोर आला नाही. पण आता या निवडणुका झाल्यानंतर अचानक राहुल गांधी यांनी दोन वर्षानंतर सावरकरांबाबत वक्तव्य करून वाद ओढावला.
उद्धव ठाकरे गटाची कोंडी?
राहुल गांधी यांच्या या नवीन वक्तव्याने उद्धव ठाकरे गटाची पुन्हा कोंडी झाली आहे. भाजपासह महायुतीमधील घटक पक्षांना टीकेचे आयते कोलीत मिळाले आहे. एकीकडे विधानसभेतील मोठ्या पराभवाने महाविकास आघाडीला झटका बसला आहे. आता पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि उद्धव सेना करत असतानाच या ताज्या वादामुळे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List