सृजन संवाद – असाही एक पर्याय!
>> डॉ. समिरा गुजर जोशी
लंकादहनाचे संकट उपस्थित झाल्यावर रावणाने बोलावलेल्या सभेमध्ये रावणाच्या सर्वच सेनापतींनी आपल्याला रामाची भीती नाही. आपण त्याला सहज हरवू शकतो, असे सांगत रामाशी युद्ध करण्याचा सल्ला दिला. अनेक जण तर आत्ताच्या आता रामाला ठार करून येतो. आपण फक्त आज्ञा द्या, असे रावणाला सांगू लागले.
अशा उत्तेजित झालेल्या सभेमध्ये सगळ्यांना शांत करत एक आवाज घुमला जो बिभीषणाचा होता. अपरिहार्य असेल तरच युद्ध करावे याची आठवण करून देत त्याने सगळ्यांना भानावर आणले. याप्रसंगी त्याने मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचा राजनीती शास्त्राचा गाढा अभ्यास त्यातून दिसून येतो.
तो म्हणाला, “आपण पूर्वी किती पराक्रम गाजवला, किती विजय मिळवले एवढ्याचाच विचार न करता आपल्याला ज्याचा सामना करायचा आहे तो शत्रू कसा आहे, त्याची शक्ती किती आहे याचा विचार करायला हवा. आजपर्यंत रामासारख्या शत्रूशी आपण युद्ध केलेले नाही. अभेद्य लंकेमध्ये शिरून हनुमान सीतेला भेटेल आणि एवढा विध्वंस करून सुखरूप परत जाईल याची आपण कल्पना तरी केली होती का? तेव्हा आपल्या शत्रूचे सामर्थ्य नीट न ओळखता अविवेकाने निर्णय घेणे योग्य होणार नाही.
रामाने रावणाशी शत्रुत्व का केले आहे याचा विचार करायला हवा. सीतेचे अपहरण करून तिला लंकेत आणेपर्यंत त्याने आपल्याला कधीही त्रास दिलेला नाही. आपण स्वतहून रामाचे संकट ओढवून घेतले आहे. सीतेला आपल्या ताब्यात ठेवणे हे धर्माला धरून नाही. निरर्थक वैर करण्यात काय अर्थ आहे. दीयताम् अस्य मैथिली – सीतेला रामाकडे परत पाठवावे.’’
आयुष्यात जरी आपण चुकीचे वागलो असो तरी ती चूक सुधारण्याची संधी आपल्या हातात असते. आपण कोणत्या पर्यायाची निवड करतो हे महत्त्वाचे असते.
बिभीषण रावणाला समजावतो की, आपली लंका वानरांच्या प्रचंड सैन्याच्या तडाख्यात सापडू नये अशी जर तुझी इच्छा असेल तसे तिला परत कर. येथे न लंका म्हणजेच ‘आपली लंका’ असे शब्द विभीषणाने वापरले आहेत. आपल्या जन्मभूमीवरचे त्याचे प्रेम इथे लक्षात येते. “पुढचा घोर विनाश टाळण्यासाठी मी तुला भाऊ म्हणून विनंती करतो आहे. तुला जे हितकारक आहे ते सत्य हेच आहे,’’ असे तो परोपरीने सांगतो. त्याचे हे बोलणे ऐकून चिडलेला रावण कोणताच निर्णय न घेता सभा विसर्जित करून टाकतो.
समाजात सज्जन माणसे असतात, पण ती दुर्जनांना विरोध करायला कमी पडतात किंवा त्या वाटेने सहसा जात नाहीत हे चित्र आपण अनेकदा बघतो. बिभीषण मात्र याला अपवाद आहे. रावणाने सभा विसर्जित करूनही त्याने रावणाची समजूत घालणे सोडले नाही. दुसऱया दिवशी सकाळी त्याने रावणाला त्याच्या महालातच गाठले. भाऊ आणि त्याचा हितचिंतक म्हणून त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. रावणाला त्याने ते सांगितले जे रावणाच्या दरबारातील त्याची हाजी हाजी करणाऱया इतर कुठल्याही मंत्र्याने कधीच सांगितले नसते. आपला खरा हितचिंतक कोण हे ओळखता येणे हेसुद्धा फार गरजेचे आहे.
त्याने रावणाला सीता लंकेत आल्यापासून लंकेचे चित्र कसे बदलले आहे हे सांगितले. सीता लंकेत आल्यापासून मला सगळीकडे अशुभ गोष्टी घडताना दिसत आहेत. तुझेही कारभाराकडे लक्ष नसल्यामुळे लंका जणू कोमेजलेली दिसते आहे. राक्षस राक्षसी घराघरातून कुजबुजत आहेत. तुला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य मात्र कुणात नाही.
या नंतर कुंभकर्ण बोलायला उभा राहतो. तो तर रावणाला स्पष्टपणे सांगतो, “आता तुला आमचा सल्ला हवा आहे. जेव्हा सीतेचे अपहरण केलेस तेव्हा का नाही मागितलास सल्ला? हे कृत्य करण्यापूर्वी का नाही केलास विचार?’’ पण कुंभकर्णाचे मत बिभीषणापेक्षा वेगळे आहे. बिभीषण पूर्णपणे सत्याच्या बाजूने असल्यामुळे सीतेला सन्मानाने परत पाठवावे एवढा एकच पर्याय त्याला दिसतो आहे. कुंभकर्ण मात्र लंकेच्या रक्षणासाठी आणि रावणावरील प्रेमापोटी रामविरुद्ध लढायला तयार आहे.
आपण मालिकांमधून पाहिलेले रामायण किंवा कथा – कीर्तनातून आपल्यासमोर आलेले रामायण आणि मूळ वाल्मीकी रामायण हे बहुमतांशी समांतर असले तरी काही काही बारकावे जे वाल्मीकी रामायणात दिसतात ते इतरत्र आढळत नाहीत. रामाचे आणि वानर सैन्याचे सेतु बांधणे सुरू असताना रावणाच्या लंकेत काय घडत होते हा असाच थोडा दुर्लक्षित भाग आहे. ह्या भागामध्ये अनेक लक्षवेधी गोष्टी आढळतात. सीतेला परत पाठवण्याचा पर्याय रावणासमोर त्याच्याच सभेमध्ये मांडला गेला होता ही जशी लक्षवेधी गोष्ट आहे तशीच रावणाबाबत एक अतिशय धक्कादायक गोष्टही ह्या भागात आपल्या समोर येते. त्याविषयी पुढील लेखात बोलूया.
[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List