प्रयोगानुभव – गूढस्य कथा : रम्या
>> पराग खोत
मानवाचा अमानवीय शक्तीशी असलेला वैचारिक झगडा असा बाज असलेले हे नाटक. तर्काच्या आधारावर यशस्वी ठरणारे ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे रहस्यमय नाटक त्यातील सशक्त मांडणीमुळे प्रेक्षकांच्या पचनी पडते आणि तो त्यात गुंतून पडतो.
शहरापासून दूर निर्जनस्थळी असलेला एक प्रशस्त बंगला. त्यात राहणारं एक जोडपं. त्यांना भेटायला आलेली काही इतर मंडळी आणि या सगळ्यांमधून घडत जाणारं नाटय़, हा आजवर अनेक नाटकांतून पाहिलेला आणि प्रेक्षकांना परिचित असलेला प्लॉट. मात्र यामधून जेवढं अपरिचित आणि अघटित घडेल त्यावर यशाचं गणित अवलंबून असतं. असंच एक गणित मांडलंय लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी. पण हे साधं अंकगणित नसून थोडं कॉम्प्लेक्स असं डिफरंशियल इक्वेशन आहे आणि याचं शीर्षक आहे ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी.’ प्रख्यात अमेरिकी लेखक डॅन ब्राऊन याच्या मूळ नाटकावरून हे बेतलंय. शीर्षकात दर्शविलेल्या वेळेचा आणि कथेचा संबंध असणार हे अभिप्रेत असलं तरी त्यातील घटनांचं विश्लेषण हे काहीसं वेगळ्या वाटेनं जातं व प्रेक्षकांना बऱयापैकी गुंतवून ठेवतं.
लग्न आणि त्यानंतर नुकतंच मूल झालेलं ऋतिका व केतन हे जोडपं मुंबई सोडून पाचगणीला त्यांच्या नव्या, मोठय़ा घरात स्थलांतरित झालं आहे. एका विधवा बाईकडून त्यांनी हे घर विकत घेतलंय आणि त्या बाईच्या दिवंगत नवऱयाच्या आठवणी तिथल्या गोष्टीत अजूनही जिवंत आहेत. म्हणूनच काही गोष्टी न बदलण्याच्या अटींवर तिने हे घर या जोडप्याला दिलंय. केतन हा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला तरुण आहे आणि त्यामुळे त्याचा या सर्वांवर विश्वास नाही. तो त्याच्या या ड्रीम होमच्या रेनोव्हेशनच्या कामाला लागलाय. अर्थात ऋतिका पण त्याच्यासोबत आहेच. परंतु तिचा या सगळ्या भावनिकतेला पाठिंबा आहे. त्यामुळे त्या बाईने सांगितलेल्या गोष्टी तिला जपून ठेवायच्या आहेत.
अशातच केतन त्याच्या कामानिमित्त बाहेर जातो आणि आठवडय़ाभरानंतर परततो. त्याला आता घराचं उरलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करायचंय. त्याच दिवशी त्याची कॉलेजमधील जुनी मैत्रीण सोनाली आणि तिचा मित्र दुर्गेश पाचगणीच्या घरात आले आहेत. कारण तसंच आहे. ऋतिकाला या नव्या घरात भास होऊ लागले आहेत. केतन घरी नसताना, रोज रात्री कोणाच्यातरी येण्याची तिला चाहूल लागतेय. तसं तिला दिसत कोणीच नाही, पण काहीतरी विचित्र अनुभव येतायत. एवढंच तिला जाणवतंय आणि त्यामुळे ती अस्वस्थ आहे. रोज रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी पावलांचे आवाज येतात आणि कोणीतरी त्या बंगल्यात येतं. ते कोण हे दिसत नसल्याने त्या घराला भूतबाधा झालीय या निष्कर्षाप्रत आलेली ऋतिका आता बिथरलीय. गेले काही दिवस ती एकटीच हे सगळं अनुभवतेय आणि आता केतन, सोनाली आणि दुर्गेश आल्यामुळे तिचा धीर वाढलाय. ती हे सगळं त्या तिघांना समजावून सांगण्याचा परोपरीने प्रयत्न करतेय. आधी त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. पण नंतर काही अतर्क्य गोष्टी घडू लागतात आणि त्यावर ते तिघे आपापल्या पद्धतीने व्यक्त होतात. त्यांच्या घरात, त्यांच्या डोळ्यांसमोरच विचित्र गोष्टी घडल्यावर ते संभ्रमात पडतात.
आधी घडलेल्या प्रकारांबद्दल ऋतिका, सोनाली आणि दुर्गेशला सांगते. सायकॉलॉजिस्ट असलेली सोनाली आणि ज्याला इतर लोक अंधविश्वास म्हणतात अशा सगळ्या गोष्टी मानणारा दुर्गेश यांच्याकडून तिला थोडी सहानुभूती मिळते. मात्र केतनला हे फारसं रुचत नाही. हे असं काहीच नसतं, तिलाच काहीतरी भास होताहेत असा पवित्रा त्याने घेतल्यामुळे ऋतिकाला राग येतो आणि ती हे आव्हान स्वीकारते. त्या रात्री कोणीही घरातून बाहेर जायचं नाही आणि जागरण करून सगळ्यांनी त्या येणाऱया आत्म्याची वाट पाहायची असं ती ठरवते. त्यानंतर सर्वजण त्या आत्म्याची वाट बघायला लागतात. रात्री बरोबर ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ तो येणार असं ऋतिका सांगते आणि… तो खरंच येतो का?
कुठलंही रहस्यमय नाटक हे त्यातल्या तर्काच्या आधारावर यशस्वी ठरतं. तर्काची मांडणी जितकी सशक्त तितकं ते प्रेक्षकांच्या पचनी पडतं आणि तो त्यात गुंतून पडतो. या नाटकातही तशीच मांडणी आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेल्या केतनच्या विरुद्ध बाजूला परिस्थितीला शरण गेलेली ऋतिका असते आणि हळूहळू सोनाली व दुर्गेश तिच्या बाजूने उभे राहतात. हा तीन विरुद्ध एक असा सामना पुढे कोण जिंकतं? की जिंकणारा हा खरं तर हरतो. हे कसं होतं?
हॉरर किंवा सस्पेन्स थ्रिलर हा बाज असलेली नाटके फारशी येत नाहीत. अशा नाटकांची निर्मिती करणं हे धाडसाचे काम आहे. कारण या नाटकांना रिपीट ऑडियन्स मिळेलच असं नाही. तसंच प्रेक्षकांना बांधून ठेवेल अशी रचना आणि शेवटपर्यंत उत्कंठा ताणून ठेवेल असं रहस्य खेळवत ठेवण्याची क्षमता असेल तरच असं नाटक यशस्वी ठरतं. इथे लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी सर्व शक्यता पडताळून नाटक उभं केलं आहे. भयनाटय़ असलं तर कुठलीही ओंगळवाणी दिसणारी वस्तू किंवा किळस येईल अशी गोष्ट इथे नाही. हा मानवाचा अमानवीय शक्तीशी असलेला वैचारिक झगडा आहे आणि इथे त्या वैचारिकतेनेच नाटकाचा बराच मोठा भाग व्यापलाय. केतनचा बुद्धिनिष्ठपणा अनिकेत विश्वासरावने छान दाखवलाय. पेशाने सायकॉलॉजिस्ट, पण तरीही अशा गोष्टींवर श्रद्धा असलेल्या सोनालीची काहीशी गोंधळलेली अवस्था रसिका सुनील पेश करते. प्रियदर्शन जाधव त्याच्या नेहमीच्या सहजतेने दुर्गेश उभा करतो. त्याच्या भाषेचा ग्रामीण लहेजा आणि विनोदनिर्मिती या तणावात आवश्यक असा रिलीफ आणते, तर गौतमी जोगळेकरने आपल्या भूमिकेचा आलेख उंचावत नेलाय. तिच्या मनातली भीती ही समोरच्या प्रेक्षकांच्या मनात उतरविण्यात ती यशस्वी ठरलीय.
रहस्यमय नाटकातलं रहस्य नेमकं काय हे शोधण्याची सवय प्रेक्षकांना असते. त्यामुळे ते तर्क लढवत असतात. लेखक, दिग्दर्शक काही ठळक क्ल्यूज, तर कधी चकवा देत देत नाटक पुढे घेऊन जातात. नीरज शिरवईकरांनी तयार केलेले नाटकाचे नेपथ्य देखणे आणि विषयाला पूरक आहे. वातावरणनिर्मितीसाठी डिजिटल क्लॉकचा केलेला वापर मस्तच. इतरही काही चक्रावून टाकणारी गॅजेट्स सफाईदारपणे वापरली आहेत. अस्मय थिएटर्सचे अजय विचारे आणि ‘प्रवेश’ या नाटय़ संस्थेच्या मंगल केंकरे त्यांचे हे नवंकोरं नाटक घेऊन आले आहेत. मनोरंजनापलीकडे जाऊन रंगभूमीवर काहीतरी वेगळं करण्याचा हा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याला दाद जायला नाटय़गृहात ला हवंच.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List