मुद्रा – ‘वेगवान’ प्रवासाची रेसर
>> वर्णिका काकडे
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली अभिनेत्री मनीषा केळकर आता फॉर्म्युला फोर कार रेसर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावत आहे. तिच्या ‘वेगवान’ प्रवासाची ही दखल.
कलाक्षेत्रातील अभिनेत्री म्हटलं की तिचं मृदू, देखणं व हसरं रूप आपल्यासमोर येतं. मात्र अशीच सुंदर छबी असणारी अभिनेत्री कार रेसिंगसारख्या क्षेत्रातही तितकाच कमालीचा परफॉर्मन्स दर्शवत असेल तर त्यावर सहज विश्वास बसणं कठीणच. मनिषा केळकर हे मराठी चित्रपटक्षेत्रातील आघाडीचं नाव. या नावामागे अभिनेत्री या बिरुदासोबत फॉर्म्युला फोर कार रेसर ही तिची ओळख तिच्यातील आगळ्यावेगळ्या क्षमतांना सिद्ध करणारी आहे.
पुरुषी वर्चस्व असलेल्या खेळांमध्ये महिलांनी स्थान पटकावणं आता फारसं नवं राहिलं नाही. मात्र आजही स्पोर्टस् कार रेसिंगसारख्या क्षेत्रात महिलांचा टक्का बराच कमी आहे. आपली मूळ आवड जोपासत अभिनयासोबतच कार रेसिंगमध्ये स्वतच अव्वल स्थान मनिषाने निर्माण केलं आहे. पुढील वर्षी मे महिन्यात जागतिक पातळीवरील फॉर्म्युला वुमन कार रेसिंग नेशन्स चँपियन कपमध्ये तिची निवड झाली आहे. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. जगभरात अनेक देशांमध्ये कार रेसिंगला स्पोर्टस क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. हिंदुस्थानात मात्र या खेळाला खेळाचा दर्जा प्राप्त व्हायला 2018 हे वर्ष उजाडावं लागलं. मात्र मनिषाचा या क्षेत्रातला प्रवास त्याही आधीपासूनचा. तिला कॉलेज जीवनापासूनच ड्रायव्हिंगची आणि मुळात वेगाची प्रचंड आवड. त्यामुळेच तेव्हापासूनच ‘गो कार्टिंग’ स्पर्धांमध्ये ती सहभागी होऊ लागली. 2005 च्या काळात याबाबत तेवढी जाण निश्चितच नव्हती.
फॉर्म्युला वुमन कार रेसिंग नेशन्स चँपियन कप या स्पर्धेमध्ये 26 देश सहभागी झाले आहेत. मनिषाची दोन वर्षांपूर्वीच या स्पर्धेसाठी निवड झाली असून दरम्यान वेगवेगळ्या फेऱया पार पडल्या. 12 डिसेंबर रोजी दुबई येथे पार पडलेल्या क्वॉलिफाइंग रेसिंगमधून आता तिची निवड या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी झाली आहे. भारतातून अशी निवड झालेली ती पहिली आणि एकमेव उमेदवार आहे. ‘अशा प्रकारे भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रचंड आनंद देणारी गोष्ट आहे,’ असं मनिषा म्हणते. याचं कारण कितीही आवड असली तरी या क्षेत्रात, खेळात पुढे जाणं तितकं सोपं नाही. याबाबत ती सांगते, ‘आपल्याकडे या खेळाबाबत अनभिज्ञता आहे. कारण खेळाचं खर्चिक स्वरूप आणि त्यासाठी असणाऱया सोयीसुविधांचा अभाव. यामुळेच अशा प्रकारे माझी निवड झाल्याने अधिकाधिक महिला या क्षेत्रात येतील आणि अल्प असलेला हा आकडा भविष्यात दुणावेल, वाढत जाईल ही अपेक्षा आहे.’
मे महिन्यातील फॉर्म्युला वुमन नेशन्स कप या कार रेसिंग स्पर्धेत ती रॅडिकल एस आर-3 ही कार रेसिंगसाठी चालवणार आहे. इथपर्यंत येण्याचा मनिषाचा प्रवास सोपा नव्हता. अभिनय या क्षेत्राचीही तिला तितकीच ओढ होती. मात्र कार रेसिंगमधील पॅशनही तिला खुणावत होतं. कार रेसिंग स्पर्धेच्या प्रशिक्षणाबाबत ती सांगते, ‘कार रेसिंगसाठी प्रशिक्षण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी आपल्याकडे फारशी उपलब्ध नाही. दक्षिणेकडील राज्यांमध्ये यासाठीच्या सरावासाठी ट्रक उपलब्ध आहेत. मी बहुतांश सराव तिथेच केला आहे. सोबत फिजिकल फिटनेस, योग आणि ध्यानधारणा हे सारंही तितकंच महत्त्वाचं. आरोग्यपूर्ण जीवनशैलीबाबत मी कायम आग्रही असते. या खेळासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या स्वतला सक्षम ठेवणं फायद्याचं ठरतं. यात ध्यानधारणेचा विशेष फायदा होतो. सुरूवातीला रेसिंगच्या सरावात जी आक्रमकता होती आता ती जाऊन स्वतच्या आक्रमकतेला आवर घालणं मला ध्यानधारणेमुळे सहजसोपं झालं आहे.’
कार रेसिंग हा खर्चिक खेळ असल्यामुळे तिकडे सहसा कुणी वळत नाही. मात्र मनिषाला यात वेगवेगळ्या नामंकित ब्रँड्सकडून आर्थिक साहाय्य मिळालं आहे. तसंच स्वतच्या खेळातला परफॉर्मन्स जास्त लाभदायक ठरला असं ती म्हणते. बाहेरच्या देशात जाऊन खेळाचं प्रतिनिधित्व करताना या खेळाने काय दिलं, कसं वाटतं या प्रश्नाचं तिने दिलेलं उत्तर ती एक अव्वल खेळाडू असल्याचं दर्शवतं. मनिषा म्हणते, ‘या खेळाने आत्मसन्मान दिला. आत्मविश्वास दिला. नव्या जगाची ओळख करून दिली. पुरुषी वर्चस्व असणाऱया क्षेत्रात माझं नाव कोरलं गेलं. हे सगळं खरं असलं तरीही यासोबत माझ्यासारख्या या क्षेत्रात येण्याची इच्छा बाळगणाऱया मुलींना, महिलांना इथे येण्याचं यामुळे बळ मिळालं. या स्पर्धेतील निवडीमुळे त्यांची वाट सोपी झाली आहे, असं त्यांना वाटण्यास हरकत नाही. म्हणूनच या स्पर्धेत मला अव्वल ठरायचं आहे आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या अर्जुन पुरस्काराला गवसणी घालायची आहे. ते माझं स्वप्न आहे.’
मनिषाचं स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. कार रेसिंगसारख्या क्षेत्रात महिलांचा टक्का कमी असताना तिथे नाममुद्रा कोरणं सोपं नाही. अभिनेत्री ही आपली ओळख कायम ठेवत आवडत्या क्षेत्रातही तितकीच उंच भरारी घेणाऱया मनिषा केळकरचा हा आलेख क्रीडा क्षेत्रातील समस्त महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे हे निश्चित.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List