मंथन – स्त्रीवादाला बळ देणारा धीरोदात्त चेहरा!
>> राहुल गोखले
पतीच्या घृणास्पद कृत्यांची बळी ठरलेली, त्याच्या विश्वासघाताची शिकार ठरलेली जेसिल पेलिकॉट. फ्रान्समधील न्यायालयात तिने लैंगिक अत्याचार प्रकरणी लढा दिला. या लढय़ाची जगभरातून प्रशंसा झाली. हा लढा म्हणजे बलात्कारित स्त्रियांचा एकत्रित लढा असे ती म्हणते. मात्र यासोबतच महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात कठोर कायदे आणि कायद्यांची कठोर अंमलबजावणी होणे किती गरजेचे आहे हेही अधोरेखीत करते.
काही योगायोग विलक्षण असतात. घटस्फोटाच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच अशी टिप्पणी केली की ‘परस्पर विश्वास, सहवास आणि एकत्र घेतलेले अनुभव हा वैवाहिक जीवनाचा गाभा आहे; तो शिल्लक राहिला नाही तर विवाहाच्या केवळ कायदेशीर बंधनाचे कलेवर उरते.’ या निकालाच्या सुमारासच फ्रान्समधील न्यायालयाने जेसिल पेलिकॉट लैंगिक अत्याचार प्रकरणी निकाल देऊन दोषींना शिक्षा ठोठवावी हा योगायोग. याचे कारण त्या प्रकरणातदेखील जेसिल पेलिकॉट केवळ आपल्या पतीच्या घृणास्पद कृत्यांची बळी ठरली नाही तर त्याच्या विश्वासघाताची शिकार ठरली. जेसिल आणि तिचा पती डॉमिनिक हे गेली पन्नास वर्षे विवाहबद्ध आहेत. या दीर्घकाळात आपल्या पतीच्या विकृत मानसिकतेची किंचितदेखील शंका जेसिलला आली नाही.
डॉमिनिक हा एका अन्य गुह्यात अपघाताने सापडला नसता तर अद्याप त्याचे हे विकृत उद्योग असेच सुरू राहिले असते आणि अज्ञानापोटी जेसिलचा आपल्या पतीवरील विश्वास अबाधित राहिला असता. मात्र 2020 साली एका किराणा मालाच्या दुकानाबाहेर डॉमिनिक महिलांचे लपूनछपून चित्रमुद्रण करीत असल्याच्या संशयावरून तेथील सुरक्षा अधिकाऱयाने त्याला पकडले. डॉमिनिकला अटक झाली. तपासातून डॉमिनिकच्या विकृततेचे एकेक पुरावे बाहेर येऊ लागले. त्यात काही आक्षेपार्ह छायाचित्रे होती आणि काही ध्वनिचित्रमुद्रणे होती. ती अर्थातच महिलेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांची होती. तपासात असे सिद्ध झाले की ती महिला अन्य कोणी नसून जेसिल म्हणजेच डॉमिनिकची पत्नी आहे. तपासात सापडलेल्या छायाचित्रांची संख्या हळूहळू हजारांत पोहोचली. त्याबरोबरच जेसिलवर लैंगिक अत्याचार करण्यास ‘आमंत्रित’ करण्यासाठी ज्या ‘आगंतुका’ंशी डॉमिनिकने पत्रव्यवहार केला होता तो आणि पर्यायाने त्या आगंतुकांची नावे यंत्रणांच्या हाती लागली. हे आगंतुक आपल्याच पत्नीवर आपल्याच ‘निमंत्रणा’वरून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे चित्रमुद्रण त्याने केले आणि आपल्या संगणकावर ते तारखेनुसार साठवले. तपास यंत्रणांनी खोलात जाऊन तपास केला असता अन्य काही महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे त्यांना मिळाली. तेव्हा ती डॉमिनिकच्या कन्येची व सुनेची असल्याचे सिद्ध झाले. एवढे सगळे पुरावे गोळा झाल्यावर पोलिसांनी जेसिलला बोलावून घेतले आणि तिच्या पतीच्या दुष्कृत्यांचा पाढा तिच्यासमोर वाचून दाखविला. तरीही जेसिल विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. याचे एकमेव कारण म्हणजे तिचा आपल्या पतीवर असणारा दांडगा विश्वास. मग पोलिसांनी तिला पुरावे दाखवले आणि मग मात्र तिचा आपल्या पतीवरील विश्वास ढासळलाच; पण स्वतही मानसिकरीत्या कोसळली.
आपल्या पत्नीची ‘वस्तू’ म्हणून डॉमिनिकने नऊ वर्षे विटंबना केली होती. लग्न झाले तेव्हा ते दोघे वयाच्या विशीत होते. आता डॉमिनिक 72 वर्षांचा आहे. त्याला न्यायालयाने वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहेच, पण या दुष्कृत्यात सामील अन्य पन्नासजणांनादेखील कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आपल्या पत्नीला तिच्या नकळत झोपेच्या गोळ्यांच्या अमलाखाली बेशुद्ध करून; मग आगंतुकांना ‘निमंत्रित’ करून त्यांना तिच्या शरीराची विटंबना करून देणारा
डॉमिनिक जितका नराधम, तितकेच यात सामील झालेले अन्य लोकही. आपल्याला यातील काही माहीत नव्हते; जेसिलला हे सगळे ठाऊक आहे अशी आपली कल्पना होती येथपासून डॉमिनिकने आपल्याला बोलावले नसते तर आपण गेलोच नसतो, येथपर्यंत निलाजरा बचाव त्या पन्नासजणांपैकी अनेकांनी करून पाहिला. न्यायालयाने तो स्वीकरला नाही. या गुन्हेगारांपैकी एकाने तर डॉमिनिकने केलेलाच प्रयोग आपल्या पत्नीच्या बाबतीत केला. न्यायालयाने त्या सर्वाना कारावासात धाडले आहे. पण प्रश्न तेवढाच नाही. या सगळ्यात जेसिलच्या आयुष्याची जी लक्तरे झाली त्याचे काय?
2013 सालापासून जेसिल सतत आजारी पडत होती. तिचे वजन घटू लागले होते; तिचे केस गळू लागले होते आणि मध्येच तिला विस्मृतीचा झटका येत असे. याचे मूळ कारण काय आहे याची पूर्ण कल्पना असूनही डॉमिनिकने जेसिलला दवाखान्यात नेले आणि तिला असे भासवले की, अल्झायमरची सुरुवात असल्याने तिला या व्याधी जडत आहेत. परंतु हा सगळा परिणाम डॉमिनिक तिला ज्या झोपेच्या गोळ्या तिच्या नकळत देत असे त्याचा होता. जेसिल सतत बेचैन असते; तिला निद्रानाशाची व्याधी जडली आहे, असे सांगून आपल्याच एका डॉक्टर भावाकडून त्याने औषधे लिहून घेतली आणि नंतर स्वतसाठी देखील तसेच ‘प्रिक्रिप्शन’ लिहून घेतले. त्याचा वापर आपल्या पत्नीला त्या औषधांच्या अमलाखाली गाढ झोप येण्यासाठी केला. त्याच डॉक्टरने न्यायालयाला असेही सांगितले की, डॉमिनिक हा लहानपणापासून खोटारडा होता. असे असताना सतत लिहून दिलेल्या ‘प्रिक्रिप्शन’मधील या विशिष्ट गोळ्यांची संख्या सुमारे आठशे होऊनही डॉक्टरला काही शंका कशी आली नाही, हेही गूढ आहे. आदल्या रात्री आपल्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाले याची तिला कल्पना असणे शक्य नव्हते. दुसऱया दिवशी जाग आल्यानंतर तिला थकल्यासारखे वाटे, पण आपण रोज खूप चालतो त्याचा हा परिणाम असेल अशी ती स्वतची समजूत घालायची. आपल्या लहानपणी आपल्याला लैंगिक शोषणाचे बळी व्हावे लागले आणि ते व्रण आपल्या मनावर कायमचे कोरले गेल्याने त्यातूनच आपण असले ‘गुन्हे’ करण्यास प्रवृत्त झालो, असे सांगून डॉमिनिकीने बचाव करण्याचा प्रयत्न केला.
अशा लैंगिक अत्याचारांचे बळी ठरलेल्या महिलांना आपली ओळख जाहीर करण्याची सक्ती नसते; किंबहुना ओळख जगजाहीर न होणेच अभिप्रेत असते. पण जेसिलने निराळी भूमिका घेत ही सुनावणी जाहीरपणे घेण्याची मागणी केली. आपल्या पतीचे दुष्कृत्य उघड झाल्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. तिने आपले आडनाव बदलले; पण हा खटला चालताना मात्र पेलिकॉट हेच आडनाव कायम ठेवले. तिने आपली ओळख लपविली नाही. तिच्या या धैर्याचे कौतुक झाले तेव्हा ‘हे धैर्य नाही.. बलात्कारित स्त्रियांचा हा एकत्रित लढा आहे. ज्यांच्यावर असे लैंगिक अत्याचार होतात त्यांनाही लढा देण्याचे धैर्य प्राप्त व्हावे… आपण एकटय़ा नसून पेलिकॉट यांनी हे करून दाखविले हे उदाहरण राहावे म्हणून खटला उघडपणे चालावा अशी आपण भूमिका घेतली,’ असे जेसिलने सांगितले. तिचे पुढचे टोकदार विधान होते की, ‘लाज आपल्याला का वाटायला हवी? ती त्या नराधमांना वाटायला हवी… आपण जो खटला अनुभवला तो एका भेकड माणसावरील खटला होता.’ जेसिलच्या या विधानांमध्ये धग आहे. आपल्या पतीवर आपण विश्वास ठेवला तो किती तकलादू ठरला याचा उद्वेग आहे.
तीन मुले, सात नातवंडे अशा भरल्या संसारात जेसिलचे आयुष्य समाधानात जात होते. ते सारे एका रात्रीत कोसळले. या खटल्याने काही बाबी प्रकर्षाने ऐरणीवर आणल्या आहेत. एक, लैंगिक अत्याचार करणारे त्या महिलेच्या परिचितांमधीलच असतात. दुसरी, लैंगिक अत्याचार हा दुर्मिळ गुन्हा नाही. शिक्षण आणि गुन्हेगारी वृत्ती यांचाही संबंध असतोच असे नाही. या पन्नास जणांमध्ये पत्रकार, परिचारिका, ट्रकचालक असे समाजातील सर्व थरांतील लोक होते. जेसिल ज्या धैर्याने या खटल्यास सामोरी गेली त्यामुळे तिला जगभरातून स्त्राrवादी चळवळी व राजकीय नेत्यांपासून अनेकांची प्रशंसा लाभली आहे. पण केवळ प्रशंसेने भागणार नाही. विशेषत महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात कठोर कायदे आणि कायद्यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहेच; पण ज्या राजकीय व्यवस्थेने जेसिल पेलिकॉट यांच्या धीरोदात्तपणाचे कौतुक केले, त्या व्यवस्थेने लैंगिक अत्याचारांच्या बळी ठरलेल्या अगणित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी तजवीज केली पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List