बावनकुळेंच्या टीकेला दानवेंचं चोख प्रत्युत्तर, मेहबुबा मुफ्ती ते राम मंदिर, संगळंच काढलं
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंगादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचं हिंदू प्रेम बेगडी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी बावनकुळे आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला असून, बावनकुळे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जाणं हे यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का? राम मंदिर गळत आहे, हे यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का? चंद्रबाबू जे बोलतात ते यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का? नितीश कुमार बोलतात ते यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणासाठी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हिंदुत्व वापरत नाहीत, हिंदुत्वाच्या प्रचारामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. शिवसैनिकांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक केसेसे आहेत. हे तर शेपूट घालून पळून जाणारे आहेत, त्यामुळे यांना शिवसेना बेगडी आहे की खरी आहे, हे शिकवण्याची गरज नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान येत्या रविवारी 15 डिसेंबरा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवे मंत्री नागपुरात शपथ घेणार आहेत. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या कामाच्या दिरंगाईमुळे मंत्र्यांचा शपथविधी नागपूरला होतोय, परंतु त्या ठिकाणी शपथविधी होणे वावगे नाही, शेवटी ती राज्याची राजधानी आहे. त्यामुळे एखादा शपथविधी तिथे झाला तर काहीही हरकत नाही, असं दानवे यांनी म्हटलं आहे. आता बावनकुळे दानवे यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List