मुंबईवर अदानीची सुलतानी, बीकेसीत महाविकास आघाडीची दणदणीत; उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह महाराष्ट्रद्रोह्यांना ठणकावले…
अस्मानी सुलतानीसारखी मुंबईवर उद्योगपती अदानींची सुलतानी आली आहे. मुंबईच नव्हे तर आसपासचा परिसरही मिंधे सरकार आणि भारतीय जनता पक्ष अदानींच्या घशात घालत आहे. पण मुंबई आमच्या हक्काची आहे. सुलतानी मोडून काढू. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिली मुंबई अदानींच्या घशातून काढून घेऊन. तो कॅबिनेटचा पहिला निर्णय असेल, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. बीकेसीतील एमएमआरडीए ग्राऊंडवर महाविकास आघाडीची दणदणीत सांगता सभा झाली. त्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. मोदी, शहा, मिंधे, फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रद्रोह्यांवर चौफेर हल्ला चढवला. ‘मुंबईवर घाला घातलात तर हम आपको काटेंगे, जरूर काटेंगे असेही उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत बजावले.
महाराष्ट्राने प्रतिज्ञा केली पाहिजे, वाट्टेल ते होवो पण महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱया आणि महाराष्ट्र लुटणाऱया लोकांना मत देणार नाही. माझा महाराष्ट्र हे केल्याशिवाय राहणार नाही.
ही निवडणूक महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी हे ठरवणारी निवडणूक आहे. छत्रपतींचा मावळा की मोदी, शहा, अदानींचा नोकर जिंकणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे.
ही निवडणूक दोन पक्षातली नाही दोन वृत्तीमधील आहे. महाराष्ट्राचे लुटारू आणि रक्षक यांच्यातील आहे. महाराष्ट्राचा सत्यानाश करणारे आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणारे यांच्यातील आहे.
प्रत्येक वचनामागे पार्श्वभूमी
महाविकास आघाडीच्या वचननाम्यातील प्रत्येक वचनामागे काही ना काही पार्श्वभूमी आहे असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आजोबांकडून ऐकायचो आणि बाळासाहेब सांगायचे की त्या दोघांना शाळेची फी भरायला पैसे नसल्याने सातवीत शाळा सोडावी लागली होती. आजही अनके मुले ज्यांना शिकायचे आहे पण घरी फी भरायला पैसै नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. मधे तर एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याने त्याच्या मुलाला शाळा सोडावी लागली. कारण डोक्यावर कर्ज, घरावर कर्ज होते आणि भरणार कोण असा प्रश्न होता. त्यामुळे मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचे वचन हे त्याचसाठी दिले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
केलंय काम भारी… लुटली तिजोरी… केलीय गद्दारी… करतोय लाचारी… आता पुढची तयारी
महायुतीने प्रचंड पैसा खर्च करून महाराष्ट्रभर मोठमोठय़ा जाहिराती केल्या आहेत. महाराष्ट्रभर लागलेली महायुतीची हार्ंडग्ज पाहिली तर कुणी, किती पैसा खाल्लाय याची कल्पना येईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महायुतीच्या केलंय काम भारी, आता पुढची तयारी या स्लोगनची त्यांनी खिल्ली उडवली. मला तर त्यांचे स्लोगन ‘केलंय काम भारी… लुटलीय तिजोरी… केलीय गद्दारी… करतोय लाचारी… आता पुढची तयारी’ असे वाटते, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.
जेथे जावे तेथे अदानी
सर्व काही अदानींच्या घशात घालण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र उघड करतानाच अदानींना काय काय दिले जात आहे त्याचा पाढाच यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुढीलप्रमाणे वाचला. तसेच सरकार आल्यानंतर यासंदर्भातील सर्व आदेश फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
- धारावीसह मुंबईच्या आसपासचा महानगरातील प्रदेश
- कोल्हापूरातील पाणी
- चंद्रपूरमधील खाणी आणि शाळा
- पालघरमधील वाढवण बंदर
- महाराष्ट्रभरातील वीज
मुंबईवर घाला
नीती आयोग हा राज्याच्या विकासासाठी मदत आणि सूचना करत असतो. पण मुंबई ही स्वायत्त आहे. ती महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाची आर्थिक राजधानीही आहे. या मुंबईचे महत्त्व मारून टाकायचे. ती पेंद्रशासित करता येत नाही. तोडण्याची भाषा करता येत नाही. कारण महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची भाषा करेल त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही अशी शिकवण आणि आदेश हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वीच दिले आहेत, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
मुंबई सरळसरळ हाती येत नसल्याने मुंबई महानगरपालिका विसर्जित करून ठेवली आहे आणि कारभाऱयांच्या हातून तिला ओरबाडणे सुरू आहे. मुंबईची ब्लू प्रिंट नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केली आहे. त्यातून मुंबईचे महत्त्व मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात त्यासंदर्भात एमओयू म्हणजे करार दोन महिन्यांपूर्वी झाला आहे. हे संकट किती मोठे आहे बघा आणि आपण कटेंगे बटेंगे कटेंगे याच्यात रमलोय. पण देवेंद्र फडणवीस आणि सर्वांना सांगतोय की, मुंबईवर घाला घातलात तर हम आपको काटेंगे, जरुर काटेंगे, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
बटेंगे तो कटेंगे म्हणताहेत. मी मुख्यमंत्री असताना एकाचीही अशी हिंमत झाली नव्हती. सर्व सुरक्षित होते. आता मोदी तिकडे असूनही भाजपवाल्यांना अनसेफ वाटत असेल तर मोदी आधी राजीनामा द्या. तुम्हाला शिवसेनेत नाही घेणार, पण सेना कशी काम करतेय ते बघा, असे सांगतानाच, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी आजची परिस्थिती आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकांची घरे पेटवून फडणवीसांना त्यावर पोळ्या भाजायच्यात
जनतेला बिथरवून भाजपला त्यांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे असे आपण त्याचसाठी बोलतो असे ते म्हणाले. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर पोळ्या भाजायच्या, मग सांगायचे… 35 पोळ्या खाल्ले बरे…अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले.
बॅग पंपनीने मला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नेमावे…
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक निवडणुकांमध्ये आपण शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलोय. पण या निवडणुकीत किमान दोन-तीन वेळा आपल्या बॅगेची निवडणूक आयोगाने तपासणी केली. आता मी बॅग कंपनीला पत्र लिहिणार आहे. बॅग तपासली. मी कंपनीला पत्र लिहिणार तुमचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवा. बॅग हो तो ऐसी हो…सबको लगे के चेक करे, अशी मिश्कील उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
माझ्या बॅगा तपासल्या, हरकत नाही, पण बुथसाठी नेमलेले भाजपचे दक्षता पथक बॅगा घेऊन राज्यभर फिरतेय. रात्री राहतात कुठे? ते कोणासाठी फिरतेय, बॅगा घेऊन फिरताहेत? त्यातील शेव फाफडा कुठून आणलाय. कोणाला काय वाटताहेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. रात्रीच्या बैठका चालल्यात आणि सर्वांकडून आढावा घेत आहेत. मतदारांवर लक्ष ठेवण्यास आतापर्यंत अशी फौज अद्याप कधी कुणी महाराष्ट्रात आणली नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले याचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
फडणवीसांच्या धर्मयुध्द शब्दावर आयोगाकडे आक्षेप नोंदवलाच पाहिजे
मतांचे धर्मयुद्ध करा असे आता देवेंद्र फडणवीस यांना बोलावे लागत आहे. मग या देशात कोणाला मतांचा अधिकार आहे आणि कुणाला नाही ते जाहीर करा, असे फडणवीस म्हणाले. मोहन भागवत जामा मशिदीत जातात, मोदीही योगींबरोबर जातात, मग धर्मयुद्ध हा शब्द येतो की नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. फडणवीस असे शब्द वापरून महाराष्ट्रात दंगलींना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे धर्मयुद्ध या शब्दावर निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवलाच पाहिजे, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिले. हा शब्द तपासून आम्हाला सांगा असे बॅगा तपासणाऱया आयोगाला विचारले पाहिजे असा चिमटाही त्यांनी काढला.
गुजराती बांधवांनीच वेळीच मोदी-शहांना आवरायला हवे होते
गुजरात किंवा गुजराथी लोकांशी आमचे भांडण नाही. पण तुमच्यामध्ये आणि देशात मोदी-शहा एक भिंत बांधताहेत. त्याची खबरदारी तुम्ही घ्या. भिंत बांधून मोदी-शहा निघून जातील. मग ती भिंत जर्मनीच्या भिंतीपेक्षा अधिक वाईट असेल. ती तोडायला कित्येक वर्ष जातील, अशी सावधगिरीची सूचना उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणाया मोदी शहांना इथल्या गुजराती बांधवांनी वेळीच अडवायला हवे होते आणि सर्व उद्योग, रोजगार पळवताय तर इथल्या लोकांच्या मुलाबाळांचे काय होणार, अशी विचारणा करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकण्यामागे कपट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये टाकण्यामागचे भाजपचे कपट कारस्थान आता आपल्या लक्षात आले असे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण राष्ट्रपुरुषांच्या यादीत कोणाचे नाव आले तर त्याचे नाव आणि पह्टो कुणीही वापरू शकतो, जसे आता लुटारू,गद्दार बाळासाहेबांचा फोटो आणि नाव लावताहेत. हिंदुहृदयसम्राटांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये त्याचसाठी टाकले गेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या सभेत आपचे कार्याध्यक्ष रुबेन, सीपीआयचे मुंबई सचिव मिलिंद रानडे, रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे सागर संसारे यांची भाषणे झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, अनिल परब, अजय चौधरी, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, भाई जगताप, निर्मला सामंत-प्रभावळकर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, आदेश बांदेकर, संजय पोतनीस, ऋतुजा लटके, श्रद्धा जाधव, बाळा नर, हारुन खान, महेश सावंत, संजय भोसले उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवर 90 हजार गुजराथी; भाजपप्रेमींवर भाजप नेतृत्वाचा विश्वासच नाही
23 नोव्हेंबरला महाविकास आघाडी जिंकणारच आहे. राज्यभर फटाके फुटणार आहेत. पण महाझुटी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाजतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. सर्व गुजरातील लोक किंवा व्यापायांना मी दोषी धरत नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. राज्यातील 90 हजार बूथवर 90 हजार लोकं भाजपने गुजरातमधून आणली आहेत असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे एका सभेमध्ये बोलल्या होत्या. भाजपच्या या षडयंत्राचा खुलासा केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना यावेळी धन्यवाद दिले. चंद्रचूडांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढून स्वतःच्या डोळ्यावर बांधली होती तशी पंकजाने महाराष्ट्रावरच्या डोळ्यावरची पट्टी काढली, असे ते म्हणाले. आज मतदान बूथवर गुजरातमधून माणसे आणली, उद्या मुंबई महाराष्ट्र बळकावण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. इथली भाजपा हरलेली आहे, भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत असा याचा अर्थ आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाया भाजपाप्रेमींवर भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास नाही, म्हणून आपल्याच कार्यकर्त्यांवर नजर ठेवायला ते परराज्यातून माणसे आणत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला आजही बौद्ध समाजाची लोकच नकोयंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान मोदींनी भारतरत्न दिले असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सिंह यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न दिले असे देशाचे संरक्षणमंत्री म्हणतात. मग उद्या ते असेही म्हणतील की रावणाचा आणि कंसाचा वधही मोदींनीच केला. अफझलखानाही मोदींनीच मारले. कारण ते एकच आहेत. एक है तो सेफ है. त्यांच्यामुळे गद्दार सेफ आहेत, गद्दार सेफ आहेत, देशद्रोही सेफ आहेत. क्षणभर मानले की आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न दिले. मग गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचा अल्पसंख्यांक आयोग नेमला गेला. ज्यात अल्पसंख्यांक समाजाची माणसे सदस्य असतात. पण त्या आयोगात बौद्ध समाजाची एकही व्यक्ती का नाही? या प्रश्नाचे आधी उत्तर द्या आणि मग तुम्ही आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न दिले हे सांगा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपला बौद्ध समाजाची लोक आजही नको आहेत, हा हलकटपणा सहन करण्यासाठी बौद्ध बांधवांनी भाजपला मते द्यायची का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
अदानीसाठी आदिवासी, कोळय़ांचे अस्तित्व नष्ट करणारा जीआर फाडून फेकून देणार
मुंबईसह किनारपट्टीच्या सात जिह्यांमधील आदिवासी पाडे आणि कोळीवाडय़ांचे अस्तित्व संपवण्याचे कटकारस्थान या खोके सरकारने क्लस्टरच्या नावाखाली रचले आहे. या जागांवर टोलेजंग इमारती बांधून त्यांना फक्त आणि फक्त अदानी आणि बिल्डरांचा विकास करायचा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले की, अदानीसाठी मिंधे सरकारने काढलेला हा क्लस्टरचा आदेश मी फाडून फेकून देणारच, असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी केला. मी विकासाच्या विरोधात नाही तर मोदी-शहांनी आणलेल्या विनाशाच्या, सत्यानाशाच्या विरोधात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. बोईसर विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी आणि पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची भव्य सभा बोईसर येथील खैरापाडा मैदानावर झाली.
मिंध्यांनी वनगाला वापरून फेकला
पालघरमध्ये चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा मान व आदर राखत मी त्यांना आपलेसे केले होते. त्यांचा मुलगा श्रीनिवासला मी आमदार केला. पण नंतर तो मिंध्यांकडे गेला. त्याचा वापर करून मिंध्यांनी वनगाला फेकून दिला. वापरा आणि फेका ही त्यांची वृत्ती आहे आमची नाही, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
या वेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते उदयबंधू पाटील, उपनेते उत्तम पिंपळे, संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, सहसंपर्कप्रमुख गिरीश राऊत, केतन पाटील, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, अजय ठाकूर, अनुप पाटील, महिला जिल्हा संघटक ममता चेंबूरकर, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, जनता दलाचे प्रकाश लवेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल उपस्थित होते.
प्रियांका गांधींनी भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले
राहुल गांधी यांच्या मुखातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द बोलून दाखवा, असे आव्हान मोदीबाबांनी परवा दिले होते. मात्र, काल शिर्डीमध्ये प्रियांका गांधी आल्या होत्या. ‘मी राहुलची बहीण आहे,’ असे सांगत प्रियांका यांनी ‘शिवसेनाप्रमुखांविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे,’ असे म्हणाल्या. म्हणजेच प्रियांका गांधींनी भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले.’
शिवसेनेची कमळाबाई होऊ देईन, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते का?
‘आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त गद्दारांनी वृत्तपत्रात जाहिराती दिल्या आहेत. अरे गद्दारा, आधी तू माझ्या वडिलांचे फोटो वापरायचे सोड! नामर्दाची अवलाद! तुझ्यात हिंमत असेल, तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मते मागायला ये. मग कसे जोडे खातोस ते बघ!’ असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. ‘जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य टाकले आहे की, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही! बरोबर आहे. मग शिवसेनेची कमळाबाई होऊ देईन, असे बाळासाहेब म्हणाले होते का?’ असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी पाटणमधील सभेत केला.
बीकेसीत फुटले प्रचाराचे फटाके
आम्ही शिवाचे सैनिक करू जिवाचे रान… शिवसेना…. शिवसेना… या प्रचार गीताचे चेतवणारे संगीत… ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला…’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणा… बीकेसीतील फटाका मैदानावर वाऱयावर डौलाने फडकणारे भगवे झेंडे, त्या जोडीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे झेंडेही डौलाने फडकत होते. पश्चिमेच्या क्षितिजावरून सूर्यास्त होताच संपूर्ण मैदान भगव्या, पिवळय़ा आणि निळय़ा लेझर दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशझोतात न्हाऊन निघाले. हातात भगवे झेंडे, गळय़ात भगवे उपरणे आणि भगव्या टोप्या घातलेल्या शिवसैनिकांचे जथे मैदानात येत होते. शिवसेनेच्या रणरागिणीही ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा देत मैदानात येत होत्या. महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही येत होते. सभेच्या भव्य व्यासपीठावर बदल घडणार… महाराष्ट्र जिंकणार… ही वाक्ये आणि त्या जोडीला शिवसेनेचे मशाल चिन्ह, काँग्रेसच्या हाताचे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीचे चिन्ह सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मैदानाच्या चारही बाजूला चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मैदानावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते. सभेला युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बीकेसीतील मैदानावर विचारांचे जोरदार फटाके फुटले.
मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचे मोदी – शहांचे कारस्थान
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहा यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. मुंबई अदानींच्या ताब्यात दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचे काम मोदी-शहांनी रचले आहे. मुंबई अदानींच्या मालकीची होत चालली आहे. अदानींची दौलत मोदी-शहांची आहे. अदानी हे मोदी-शहांची दौलत सांभाळत आहेत. धारावीतून एक लाख कोटी रुपयांचा फायदा मोदींच्या एजंटना मिळणार आहे. विमानतळ, जकातनाके, मिठागरे आणि मराठी माणसाच्या जागा अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. मोदींना विरोध केला म्हणून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. पक्ष फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आता गद्दारांचे राज्य आहे. त्यांचे काय करायचे त्याचा निर्णय येत्या निवडणुकीत जनता घेईल, असे ते म्हणाले.
निवडणुकीत मोदी-भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असे सांगत होते. आता गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन संजय राऊत यांनी केले.
महाराष्ट्र विकला जाणार नाही
मिंध-भाजपकडून निवडणुकीत होणाऱया पैशाच्या वापराकडे लक्ष वेधताना संजय राऊत म्हणाले की, गुंडगिरी झुंडगिरीमुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे. खोक्याची भाषा सुरू आहे. जमिनीतून, आकाशातून पैसे कुठून येतात ते समजत नाही. पण महाराष्ट्र- मराठी माणूस विकला जाणार नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले.
महाविकास आघाडीचे नेते निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सर्वत्र जोरदार प्रचार बघून मोदी-शहा महाराष्ट्रातून निघून गेले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 170 जागा मिळणार आहेत. आपण महाराष्ट्रात जास्त काळ राहिलो तर महाविकास आघाडीला 200 जागा मिळतील अशी मोदी-शहांना भीती वाटली म्हणून ते महाराष्ट्रातून निघून गेले याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.
तुम्हारी फाडेंगे
‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, हम बटेंगे नही, कटेंगे नही… हम तुम्हारी फाडेंगे असा निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केला आहे. या निवडणुकीत मोदी-शहांना जागा दाखवण्याचे आवाहन संजय राऊत यांनी केले. तुम्ही येणे बंद करा. महाराष्ट्र सेफ राहील, असा टोला संजय राऊत यांनी मारला.
नागपूरचे झेंडे उतरणार
ही निवडणूक जिंकली तर पाकिस्तानवर झेंडे फडकवू, असे देवेंद्र फडणवीस सांगतात; पण तुमच्यात हिंमत असेल तर मणिपूरमध्ये जाऊन झेंडे फडकवा. नागपूरमध्ये तुमचा झेंडा उतरणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी मारला.
महाराष्ट्र वाचवण्याची लढाई
न्यायमूर्ती चंद्रचूड निवृत्त होण्यापूर्वी आम्हाला न्याय मिळेल असे वाटत होते. गद्दारांचे सरकार बरखास्त करतील असे आम्हाला वाटत होते, पण ते निवृत्त झाले. आमच्या लोकशाहीची न्यायाची हत्या झाली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्याय मारला असला तरी 20 तारखेला होणाऱया विधानसभेच्या निवडणुकीत मतदारच न्याय करून गद्दारांना जागा दाखवतील. ही लढाई महाराष्ट्राच्या सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्र वाचवण्याची लढाई आहे. महाराष्ट्र विजयी करायचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जुडेंगे तो आगे जायेंगे – वर्षा गायकवाड
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकार, मोदी-शहा, शिंदे आणि गद्दारांवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईतील जमिनीच नव्हे, तर बंदरे, विमानतळ, शाळा अदानींच्या घशात घातल्या जात आहेत. आता ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. पण ‘आपण जुडेंगे तो आगे जायेंगे’ एवढे लक्षात ठेवा असे सांगून, त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिंकून देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र जिंकून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या सत्तेवर मोदी-शहा नावाचे दलाल – विद्या चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा जोरदार समाचार घेतला. खोटे हिंदुत्व आणि ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणा देणाऱयांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. मोदी आणि शहांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, देशाच्या सत्तेत दोन दलाल बसले आहेत. त्यांच्यामुळे देश अंबानी-अदानींच्या घशात घातला जात आहे. एअर इंडिया कॉलनी अदानीच्या घशात घातली आहे. या कॉलनीत लोकांची फिरण्याची जागा होती. ही कॉलनी आता अदानीच्या ताब्यात गेल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. देश अंबानी-अदानींना विकला जात आहे. त्याविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन विद्या चव्हाण यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List