बंदी घातलेल्या प्लॅस्टिकवरील कारवाई ठप्प, आता निवडणुकीनंतरच वेग घेणार
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेली प्रतिबंधित प्लॅस्टिकवरील कारवाई आता अक्षरशः ठप्प पडली आहे. पालिकेकडून कारवाईचे काम करणाऱ्या टीम निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे कारवाईवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आता निवडणुकीनंतरच ही कारवाई होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ही कारवाई प्रथम पालिकेच्या मंडया व त्यानंतर मार्केटध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईत 26 जुलै 2005 रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले होते. या महापुराला प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचे समोर आले. त्यानंतर 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र कोरोनामुळे ही कारवाई थंडावली होती. कोरोना आटोक्यात आल्यानंतर 1 जुलै 2022 पासून पालिकेने कारवाईचा वेग वाढवला. त्यानंतर काही महिने पालिकेने बाजारात, मॉल, उपाहारगृहे आदी ठिकाणी प्लॅस्टिकवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर मात्र कारवाई पुन्हा थंडावली. त्यामुळे सध्या बाजारात प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसत आहे.
या प्लॅस्टिकवर बंदी
- सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या (सर्व जाडीच्या).
- प्लॅस्टिक डिश, बाऊल, पंटेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, स्टिरर्स.
- नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स – 60 ग्रॅम प्रति चौरस मीटर (स्क्वेअर मीटर) (जीएसएम) पेक्षा कमी वजन असलेल्या प्लॅस्टिक कोटिंग, प्लॅस्टिक थर असणाऱ्या पेपर/अॅल्युमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स आदी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List