आचारसंहितेची ऐशी की तैशी…चेंबूरच्या घाटला परिसरात सत्ताधाऱ्यांचे साडी वाटप; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
चेंबूर विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेची ऐशी की तैशी सुरू आहे. सत्ताधारी पक्षांकडून चेंबूरच्या घाटला परिसरात घरोघर जाऊन साडी वाटप केले जात आहे. हा आचारसंहितेचा भंग असून त्यासंदर्भात संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिवसेनेने या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. गेले तीन-चार दिवस काही लोक चेंबूरच्या घाटला परिसरात घरोघर जाऊन साडी वाटप करत असल्याच्या तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या होत्या. रविवारी शिवसैनिकांनी त्या परिसरात जाऊन साडी वाटप करणाऱया दोन जणांना रंगेहाथ पकडले. त्यांचा साडी वाटप करतानाचा व्हिडीओही काढण्यात आला.
सदरहू दोन जणांना या साडी वाटपाबाबत शिवसैनिकांनी विचारले असता लाडक्या बहिणीला पैसे देतोय तशाच साडय़ाही देतोय असे उत्तर त्यांनी दिले. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List