मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातले इतर प्रकल्प अदानीच्या घशातून काढून घेऊ, उद्धव ठाकरे कडाडले
लुटमार मंत्र्यांनी महसूल खातं स्वतःच्या घरतल्या लग्नासाठी वापरलं, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनी केली आहे. तसेच मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातले इतर प्रकल्प अदानीच्या घशातून काढून घेऊ आणि महाराष्ट्राला परत देऊ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज साताऱ्यातील पाटणमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, इथली विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवायला आलोय. गद्दारी, गद्दारी किती गद्दारी , तीही पाटणशी. गद्दारांनी कारण दिलं होतं की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती केली. मग इथे जे लुटमार मंत्री आहेत त्यांना मी विचारतो की तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मंत्री होते. मग तेव्हा तम्हाला दिसलं नव्हतं काँग्रेसच काय झालं. पुढे यांना काँग्रेसमध्ये कोणी विचारत नव्हतं म्हणून आपल्या कळपामध्ये घुसले. बाळासाहेब देसाई आण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तेव्हापासून ऋणानुबंध होते, म्हणून आम्हाला दया आली आणि त्यांना पक्षात घेतलं. पण तेव्हा माहित नव्हतं की हे लुटमार करणारे करंटे असतील. आपण मंत्री केला आणि काल मिंधे म्हणाले की गद्दारी करण्यात हाच लांडगा पुढे होता. आणखी एक पुढे होता तो म्हणजे महेश शिंदे. यांना शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद वाटली काय? मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत आता गद्दारी करून तिकडे गेले तर तिथेही मंत्रिपद. म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होईन मी वाजंत्री असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लुटमार मंत्री
इथे तीन उमेदवार आहेत. एक मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री. त्यांनी महसूल खातं स्वतःच्या घरच्या लग्नासाठी वापरून लुटलं. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, प्रशासकीय विभागात माझे काही संबंध आहेत. आपली सत्ता येऊदे ही सगळी प्रकरणं कशी मार्गी लावतो बघाच. एका बाजुला मस्तीत राहणारे लुटमार मंत्री
आणि दुसरीकडे प्रतिस्पर्ध्याचे आव आणणारे.
लूट भारी आता पुढची तयारी
मुंबई आणि परिसरात होर्डिंग लागले आहेत. त्यात लिहिलंय की केलंय काम भारी. त्याचा अर्थ असा की केलीये लूट भारी आता पुढची तयारी. पुढची तयारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचा. अशा या लाचार आणि बुटचाट्या लोकांना आपण फक्त मत नाही तर आयुष्य हा महाराष्ट्र त्यांच्या हातात देणार आहोत परत? निवडणुकीत हार जीत सुरूच असते, पण या निवडणुकीत हर्षद जर हरला महाराष्ट्र हरेल आणि जिंकला तर संपूर्ण महाराष्ट्र जिंकेल.
गृहखात्याचा दुरुपयोग
सुरुवातीला हे धेंड कसं होतं. आता वाकणं, झुकणं सुरू आहे. पण दुर्दैवाने पुन्हा निवडून आले तर असे ताठ होतात की सरळ उचलायचं आणि कार्यक्रमाला घेऊन जायचं एवढे ताठ होतात. त्यांना मी गृह खातं दिलं, पण त्यांनी याचा दुरूपयोग केला आणि गद्दारांना जायला मदत केली. तुम्हाला महाराष्ट्रातलं जेवण पचत नसेल तर गुजरातला रहायला जा. आता हे लोक फक्त ढोकळा नाही खात महाराष्ट्र खात आहेत. मुंबई तर अदानीच्या घशातून मी काढलीच समजा, मी त्यांना मुंबई गिळू नाही देणार. त्यांचे चारपाच दिवस बाकी आहेत. अदानीच्या घशात घातलेली मुंबईच नाही तर महाराष्ट्रातले इतर प्रकल्प जे घातलेत ते अदानीच्या घशातून काढून पुन्हा महाराष्ट्राच्या हातात देईन.
स्वतःच्या वडिलांचा फोटा वापरावा
आज शिवसेनाप्रमुक बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन. गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो वापरून जाहिरात छापली आहे. गद्दारांनी आधी माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा बंद करावा. नामर्दाची औलाद, आधी स्वतःच्या वडिलांचा फोटा वापरावा आणि मत मागायला ये मग लोकांचे जोडे खाता ते बघा. जाहिरातीत बाळासाहेबांच वाक्य टाकलं आहे की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बरोबर आहे, मग बाळासाहेब असे म्हणाले होते का की भाजपची कमळाबाई होऊन देईन.
जाहीर धमकी
मुन्ना महाडिक काय आमच्या बहीणींना नोकर समजता का? बेडकासारख्या उड्या मारत राज्यसभेत पोहोचले. महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या महिलेच्या केसाला धक्का जरी लागला तर मुन्ना महाडिकचा हात उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बहीणीला धमकी देत असेल तर मी ही जाहीर धमकी देतोय असं समज कारण हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे.
महाराष्ट्राचे हे तण मुळापासून उखडून टाका
आमचे सरन्यायाधीश चंद्रचूडजी निवृत्त झाले पण निकाल काही लागला नाही. दोन वर्षात खुप काही बोलले पण निकाल कुठे आहे.हा सगळा गोंगाट सुरू आहे हे संविधान बदलले नाही का? हा धोका अजून गेलेला नाहीये. आता ही ताकद मुळापासून काढायची गरज आहे. लोकसभेत महाराष्ट्राने भाजपला दणका दिला आहे, आता विधानसभेलाही दणका द्यायचा आहे. पुढे महानगरपालिका, ग्रामपंचायत जिथे जिथे भाजप आणि मिंधेंचे उमेदवार दिसतील तिथून महाराष्ट्राचे हे तण मुळापासून सूरत किंवा गुवाहाटीला उखडून टाका.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List