एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हे दिल्लीचे बुट चाटतात, संजय राऊत यांचा घणाघात
बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा तिरस्कार केला नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हे दिल्लीचे बुट चाटतात असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी नेहमी खोटं बोलतात. 2014 पासून मोदी खरं काय बोलले याच्यावर संशोधन झाले पाहिजे. मोदीजी कधी तरी खरं बोलतात का यार पीएचडी होऊ शकते. मोदी शहा हे नेहमी खोटं बोलत आले आहेत. खोट्या पदवीपासून ते खोटी आश्वासनं, मोदींचं सर्वच खोटं आहे असेह संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या अस्त्वित्वाची लढाई
देवेंद्र फडणवीस यांच्या अस्त्वित्वाची लढाई आहे आणि आमच्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. फडणवीस अस्तित्वासाठी लढत आहेत, कारण गेल्या अडीच वर्षात भाजपने त्यांचं अस्त्वित्व संपवलेलं आहे. ही महाराष्ट्राची निवडणूक आहे, महाराष्ट्रात सर्व सुरळीत सुरू असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बगलबच्च्यांना त्यांचा पराभव दिसतोय. म्हणून जात- धर्म हिंदु मुसलमान, वोट जिहाद, हे विषय त्यांनी आणलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बेरोजगारीवर, शेतकरी आत्महत्या आणि महाराष्ट्रातून जे उद्योग गुजरातला जात आहेतया विरोधात युद्ध पुकारायला पाहिजे होतं. यावर न बोलता निवडणूक जिंकण्यासाठी हा जिहाद तो जिहाद. भाजपजच्या या नालायकपणापुढे महाराष्ट्राच्याच 13 कोटी जनतेने युद्ध पुकारले आहे, त्याला तुम्ही जिहाद म्हणाल आम्ही त्याला युद्ध म्हणतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील तुळशी वृंदावनात देवेंद्र फडणवीसांसारखी भांगेची रोपटी यावेळी उपटून टाकू. भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लावली आहे, ती या राज्याची जनता सहन करणार नाही.
शिवसेनेची कोंडी करण्यासाठी सुपाऱ्या
शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी झालेले हे कारस्थान आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी सुपाऱ्या वाजवायच्या असे राजकारण वाढलेले आहे. आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन. शिवतीर्थावर लाखो लोक येतील त्यामुळे सभेसाठी आम्हाला परवानगी मिळायला हवी होती. आम्हाला परवानगी मिळू नये म्हणून एक दिवस आधी कागद दिला आणि शिवसेनेला शिवतीर्थावर सभा घ्यायला रोखण्यात आलं. याला जळफळाट, विकृती म्हणावं लागेल. तुम्ही सभा घेत नाही आणि आम्हालाही सभा घेऊ देत नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यामातून हे गुजरातचे महाराष्ट्राविरोधात कारस्थान आहे.
शिंदे आणि त्यांचे सहकारी हे दिल्लीचे बुट चाटतात
एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हे दिल्लीचे बुट चाटतात. दिल्लीची हुजरेगिरी करतात हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर पाठिंबा दिला आहे. बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार या काँग्रेस नेत्यांसोबत बाळासाहेबांनी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रात एकोपा राहिल याची त्यांनी नेहमी काळजी घेतली. एकनाथ शिंदेंना काय माहित बाळासाहेब ठाकरे, त्यांनी टेंभी नाक्यपलीकडे जग पाहिले नाही, ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे शिकवणार?
बाळासाहेबांचे त्यांचे विचार आजही आमच्यासोबत
आज 12 वर्ष झाली बाळासाहेबांना जाऊन. बाळासाहेब शरीराने आमच्यासोबत नाहीत पण त्यांचे विचार आजही आमच्यासोबत आहेत. राज्यात निवडणूक सुरू आहे. बाळासाहेब गेल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा असं वाटतंय की ही निवडणूक आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही लढत आहोत. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.बाळासाहेबांनी आमच्या न्याय आणि हक्काचा प्रश्न मांडला होता, आज त्यावरच संकट आले आहे. महाराष्ट्रातले उद्योग धंदे आणि नोकऱ्या गुजरातला नेले जात आहेत. अशा वेळेला आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. आपला स्वाभिमान आपल्याला जपायचं असेल तर आपण बाळासाहेबांना कधीच विसरता कामा नये. आजचा दिवस त्यांच्या विचारांना जपण्याचा आहे, त्यांचे विचार घेऊनच आम्ही लढत आहोत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List