महाराष्ट्र अंधारात ढकलला, परिवर्तनाची मशाल पेटवा; आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्गात झंझावाती सभा
आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे, असा घणाघात शिवसेन नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सिंधुदुर्गातील प्रचारसभेत केला. भाजपला सर्व अदानीच्या घशात घालायचे आहे. भाजपचे खरे मुख्यमंत्री हे अदानीच असून हे बदलण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. भाजपने महाराष्ट्र अंधारात नेला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी, परिवर्तनासाठी मशाल पेटवावीच लागेल, अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात परिवर्तन अटळ आहे. महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. गद्दारांना धडा शिकवून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीला साथ द्या, असेही त्यांनी केले.
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार संदेश पारकर, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक आणि सावंतवाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्गात झंझावाती प्रचार सभा झाल्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्यासाठी जागतिक पातळीवर मार्केट उपलब्ध करून देण्याचा तसेच शेतकऱयांना फसवणाऱया विमा कंपन्यांबाबतही पुनर्विचार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सुरक्षित बहिणींसाठी शक्ती कायदा आणण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर 20 तारखेला चुकू नका असे आवाहन केले. तर संदेश पारकर यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला. सिंधुदुर्गमधील जनतेने गेली 35 वर्षे यांना सत्ता दिली, अनेक पदे दिली, परंतु यांनी स्वतःचा विकास केला. यांनी विकास केला असता तर गावागावात पैसे का वाटता, असा टोला पारकर यांनी लगावला.
माणगाव येथील सभेत बोलताना उमेदवार वैभव नाईक म्हणाले की, विरोधक म्हणत आहेत की वैभव नाईक यांनी काय काम केले? मी गेल्या दहा वर्षांत काम केले म्हणून माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझ्या मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे, हेच त्यांचे अपयश तर माझे यश आहे.
भाजपने फसव्या योजना आणल्या
भाजपने 2014 पासून फसव्या योजना आणल्या. पहिली योजना 15 लाख देण्याची होती, त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. पुन्हा भाजप सत्तेत आल्यास 1500 मधील दोन शून्य काढून केवळ 15 रुपये देण्याची योजना आणतील. यामुळे फसव्या भाजपपासून सावध राहा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. झाशी येथील अग्नितांडवामध्ये दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला, मात्र या घटनेबाबत कोणतेही दुःख सत्ताधाऱयांना झाले नाही वा कोणताही कार्यक्रम त्यांनी रद्द केला नाही. अशा संवेदनशील, महिला सुरक्षेबाबत पर्वा नसलेल्या भाजप सत्ताधाऱयांना दूर करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List