मुंबई, महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रहार करत त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडला. तसेच मुंबई महानगर अदानीच्या घशात घालण्याचे षडयंत्र सुरू असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी-शहा, अदानीचा यांचा नोकर जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सोमवारी प्रचाराच्या थंडावल्या अशा बातम्या येणार असल्या तरी तोफा फक्त महाविकास आघाडीकडे आहेत. महायुतीकडे प्रचाराच्या थापा थंडावणार आणि 23 तारखेनंतर महाझुठी आघाडी नाहीशी होणार. आपण महाराष्ट्रभर फिरतोय. सर्वत्र मोठी होर्डिंग्ज लावली आहेत. त्यावरून कोणा किती पैसे खाल्ले याचा अंदाज येतोय. भाजपा आणि मिंधे यांचीही मोठी होर्डिंग्ज आहेत. त्यांची स्लोगन चांगली आहे.’केलंय काम भारी, लुटलीय तिजोरी, केलीय गद्दारी, करतोय लाचारी, आता पुढची तयारी’ असे काही वाचले तर जरा चांगले वाटते. अशी कल्पकता हल्ली कमी बघायला मिळते. कोणत्या तोंडाने ते काय बोलत आहे, तेच त्यांना कळत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
आपल्या वचननाम्यातील प्रत्येक वचनाला पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा आणि वडील यांना शाळेची फी भरायला पैसे नव्हते, म्हणून त्यांना सातवीत शाळा सोडावी लागली होती. आजही राज्यात अशी अनेक मुले आहेत. ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे पण शाळेची फी भरायला पैसे नाहीत, त्यामुळे शाळा सोडावी लागते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला नाईलाजाने शाळा सोडावी लागली. त्यामुळे राज्यात मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचे वचन आपण दिले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही लढाई महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जिंकणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार ही मोदी-शहा, अदानीचा यांचा नोकर जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. दरवेळी निवडणुकीच्या काळात मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो. मात्र, हा अपप्रचार नाही. सरकारला महाराष्ट्राचा जीडीपी वाढवायचा आहे. त्यासाठी मुंबई महानगर मोठमोठे बिल्डर आणि विकसकांना देण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. याची सुरुवात झाली आहे.
दिल्लीतील नीती आयोग राज्याच्या विकासाला मदत करत असतो. सूचना करत असतो. आपली मुंबई स्वायत्त आहे. राज्याची राजधानी आहेच. पण देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीचे महत्त्व कमी करण्यात येत आहे. केंद्रशासित करता येत नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करू शकत नाही. जो कोणी मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचे प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे तुकडे करण्याचे आदेश आणि शिकवण आपल्याला हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे तेदेखील त्यांना शक्य नाही. त्यांना सरळ लढता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिका विसर्जीत केली आहे. त्यांच्या कारभाऱ्यांकडून सर्व ओरबाडण्याचे काम सुरू आहे. मुंबईची एक ब्लू प्रिंट नीती आयोगाकडून तयार केली आहे. त्यात मुंबई महापालिकेचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. वर्ल्ड इकोनॉमी फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे हे संकट किती मोठे आहे, याचा अंदाज येतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यावर आणि मुंबईवर संकट असताना त्यांचे बटेंगे, कटेंगे आणि फटेंगे सुरू आहे. भाजप आणि फडणवीस यांना आपण इशारा देत आहोत की, मुंबईवर घाला घातलात तर हम आपको काटेंगे और जरूर काटेंगे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. राज्यातील समस्या, मुद्दे यावर बोला. आम्हीही त्यावर बोलतो, तुम्हीही त्यावर बोला. आपण मुख्यमंत्री असताना कोणाचीही हिंमत नव्हती. सर्वजण सेफ होते. आता मोदी यांना अनसेफ वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्या, तुम्हाला शिवसेनेत घेणार नाही पण शिवसेना कशी काम करते ते बघा, तुम्हाला अनसेफ वाटणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
2014 मध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आजही तोच प्रश्न आहे. यांनी महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेला आहे. संस्कार, संस्कृती , भाषा काहीही मर्यादा त्यांनी ठेवलेल्या नाहीत. कोठेतरी अंधारात नेऊन ठेवलेय, जनतेला बिथरवून टाकत ते स्वतःच्या पोळ्या भाजत आहेत. आपले हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे तर त्यांचे हिंदुत्व घरांची होळी करत त्यावर पोळ्या भाजण्याचे आहे. असा नतद्रष्ट विचार त्यांचा आहे. वर ते सांगतात 35 पोळ्या खाल्ल्या बरे, पण लोकांची घरं जळाली त्याचे काय, लोकांची घरं जळाली तर चालतील पण आमच्या राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या पाहिजेत, अशी त्यांची नीती आहे, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजप संविधान बदलायला निघाले होते, ते त्यांच्याच नेत्यांचे वक्तव्य होते. आपण हा मुद्दा लोकसभा निवडणुकीला लावून धरला होता. त्याचा त्यांना मोठा फटका बसला. त्यानंतर फेक नरेटिव्ह अशी ओरड त्यांनी केला. आता हा एमओयू सामंजस्य करार, हे फेक नरेटिव्ह आहे काय, फक्त धारावीच नाही तर ते मुंबईच ते अदानीच्या घशात घालायला निघाले आहेत. मुंबआ आणि मुंबईचा परिसर, राधानगकीतील पाणी अदानीला, चंद्रपूरातील खाणी आणि शाळा अदानीला दिली आहे. पालघरला बंदर झाल्यावर ते अदानाली देण्यात येणार आहे. संकट फार मोठे आहे. आता महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट आहेत. हे सर्व सत्य आहे. हे फेक नरेटिव्ह नाही. आमचे सरकार आल्यावर अदानीला दिलेल्या जमीनी, शाळा, खाणी काढून घेणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्यातील 90 हजार बुथवर त्यांनी गुजरातमधून माणसे आणली आहेत. आज आपल्यावर नजर ठेवायला, त्यांनी गुजरातमधून माणसे आणली आहेत. उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा त्यांचा डाव आहे, यात तर काही फेक नरेटिव्ह नाही ना, असा सवालही त्यांनी केला. गुजरातमधून माणसे आणली म्हणजे येथील भाजप हरलेली आहे. इथे त्यांच्याकडे निष्ठावान नाही. इथल्या भाजप्रेमींवरच त्यांचा विश्वास नाही. त्यासाठी परराज्यातून माणसे आणून ती लक्ष ठेवत आहेत.
यावेळी प्रचारकाळात त्यांनी दोन-तीन वेळा बॅगा तपासल्या. त्या पथकाचा खर्च कोण करतोय. त्यांच्या बॅगेतील फाफडा ढोकला कोठून येतोय. ते कोणासाठी फिरत आहेत. कोणाला काय वाटत आहेत. अशाप्रकारे दुसऱ्या राज्यातील फौज नजर ठेवण्यासाठी कधीही आणण्यात आली नव्हती. जनतेची दिशाभूल आणि जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांनीच भारतरत्न दिले. रावणाचा आणि कंसाचा वध मोदीनींच केला, असे ते सांगतील, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्या ते म्हणतील अफजल खानाला मोदींनीच मारले. त्यांच्यासाठी मोदीच सरव्स्व आहेत. मोदी हे म्हणून भ्रष्टाचारी, गद्दार, देशद्रोही सेफ आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.
राज्यात अल्पसंख्याक आयोग नेमण्यात आला, त्यात एकही बौद्ध समजाचा प्रतिनिधी का नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आजही ते त्या समाजाशी फटकून वागत आहेत. त्यांना या समाजाची लोकं नको आहेत. बुसरटलेले गोमूत्रधारी त्यांचे हिंदुत्व आहे. हे सर्व सहन करण्यासाठी आपण त्यांना मतं द्यायची का, राज्यात अनेक समस्या आहेत. शेतकरी संकटात आहेत. सोयबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हमीभावाअभावी संकटात आहे. तुम्ही हे सरकार बदला. आपले सरकार आल्यावर शेतकरी कर्जमुक्त होणार आहे. सोयाबीनला पुन्हा 7 हजाराचा भाव मिळणार आहे. सरकार बदलले तर तुमचे आयुष्य बदलणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज शिवसेनाप्रमुख यांचा स्मृतीदिन आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत अभिवादन केले आहे. हे नरेंद्र मोदी आणि अमिश शहा यांनी लक्षात घ्यावे. कलम 370 कलमाचा मुद्दा ते उपस्थित करतात. मात्र, ज्यावेळी कश्मीरी पंडित निर्वासित झाले त्यावेळी फक्त शिवसेनाप्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रात आश्रय दिला. 370 कलम काढले त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, त्या मुद्द्याच्या राज्यातील निवडणुकांशी काय संबंध, त्यामुळे राज्यातील समस्या सुटणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र लुटण्यासाठी त्यांनी शिवसेनेवर घाव घातला, मात्र त्यांच्या डोक्यातच सोटा बसलाय. मी मुंबई लूटू देणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास त्यांना बघवत नव्हता. त्या पोटदुखीमुळे आणि मुंबई लुटण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असा हल्लाबोल त्यांनी केला. मुंबईला बुलेट ट्रेनची गरज आहे काय. या ट्रेनने कोण प्रवास करणार आहेत. धारावीकडे याचे स्थानक का आहे, याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यांनी कपटकारस्थानासाठी राष्ट्रपुरषांच्या यादीत टाकले. त्यामुळे मिंधे आणि भाजप त्यांचे फोटो वापरू शकत आहेत. मिंधेना आपण आव्हान दिले आहे, मर्द असशील तरप स्वतःच्या वडिलांचे नाव आणि फोटो लावत मतं मागा, जनतेचे जोडे बसतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List