मराठी माणसाला मुंबई आणि महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे मोदी – शहा यांचे कारस्थान, संजय राऊत यांचा हल्लाबोल
मराठी माणसाला मुंबई आणि महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. आज मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
आज 55 वर्षानंतर तोच प्रश्न आणि त्याच समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. मराठी माणसाला मुंबई आणि महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी रचले असून त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी उभी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
या सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. साहेबांना जाऊन आज 12 वर्ष झाली. पण हे 12 वर्ष साहेब आपल्याबरोबरच आहेत. संकटात, लढाईत सदैव ते आपल्यासोबतच आहेत. त्यांचे विचार, त्यांचे अस्तित्व आपल्यासोबत आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करत असल्याने वादळात सापडलेली आपली नौका आपण किनाऱ्याला लावू शकलो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.”
ते म्हणाले, ”75 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईमधील मराठी माणसाला त्याचे न्याय- हक्क मिळायला पाहिजे, महाराष्ट्रातील मराठी माणूस स्वाभिमानाने- अभिमानाने जगला पाहिजे. मराठी माणसाला वाटलं पाहिजे, ही मुंबई माझी आहे, माझ्या मालकीची आहे. या मुंबईसाठी आम्ही 105 हुतात्मे दिले. तरी जर या मुंबईत आम्हाला कोणी गुलामासारखे वागवत असेल, त्यांना आव्हान देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.”
संजय राऊत म्हणाले की, ”या निवडणुकीत मला नेहमीची विचारतात तुमचे प्रतिस्पर्धी कोण? मी म्हटलं, प्रतिस्पर्धी सोडून द्या. या महाराष्ट्राचे दोन दुष्मण आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा. या दुष्मणांना या शिवरायांचा महाराष्ट्रात यावेळी पूर्णपणे गाडल्याशिवाय, लोळवल्याशिवाय राहणार नाही.”
”आज मुंबई ही गौतम अदानीच्या मालकीची झाली आहे. गौतम अदानीची दौलत ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची दौलत आहे. अदानी फक्त त्यांची दौलत सांभाळत आहेत. अख्खी धारावी अदानी यांच्या घशात घालून, त्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयांचा फायदा गौतम अदानीबरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एजंट यांना मिळणार आहे. मुंबईतील 250 एकर मिठागर, एअरपोर्ट, जकातनाके आणि मुंबईत ज्या काही सुंदर गोष्टी आहेत, त्या गौतम अदानी याच्या घशात घालण्याचे काम नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि हा मिंधे करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने याला विरोध केल्याने सरकार पाडलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. कारण आम्ही अदानीची दलाली करण्यास नकार दिला”, असं संजय राऊत म्हणाले.
”निवडणूक आयोग जरी विकला गेला तरी आम्हाला अशा होती की, देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी चंद्रचूड नावाचा एक माणूस बसला आहे. त्याकडून आम्हाला न्याय मिळेल आणि या गद्दारांना शासन मिळेल. हे बेकायदेशी सरकार ते बरखास्त करतील, अशी आम्हाला अशा वाटत होती. चंद्रचूड जेव्हा न्यायालयात बसायचे तेव्हा मोठमोठ्या गप्पा मारायचे. हे कसं बेकायदेशीर आहे, राज्यपालांनी कसं चुकीचं काम केलं. आम्ही म्हणायचो चंद्रचूडसाहेबांचं नाक फार लांब आहे, हे आपल्याला न्याय देतील. मात्र अडीच वर्षांनी चंद्रचूड हे निवृत्त झाले आणि तारखांवर तारखा देत हा आमचा विषय त्यांनी केराच्या टोपलीत टाकला. अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या झाली, न्यायाची हत्या झाली. मात्र जरी त्यांनी तिथे न्याय मारला असला तरी 20 तारखेच्या मतदानादिवशी जनता न्याय केल्याशिवाय राहणार नाही”, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
”ही लडाई शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सत्ता हवी आहे, म्हणून नाही. तर ही लडाई महाराष्ट्र आणि मुंबई वाचवण्याची आहे. मी प्रत्येक सभेत सांगतो, उमेदवार, पक्ष आणि चिन्ह पाहू नका. या निवडणुकीत आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं आहे”, असं राऊत म्हणाले.
भाजपवाले नेहमी सांगतात जर नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. मी आता सांगतो, 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटायचे नसतील, तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा, असं आवाहन संजय राऊत यांनी नागरिकांना केलं.
भगवे कपडे घालून एक जोकर येतोय, हा योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून त्याचा अपमान करत आहे. तिथे त्याच्या राज्यात रुग्णालयाला आग लागली आणि यात 12 नवजात अर्भक जळून मेली. हा महाशय आमच्याविरोधात प्रचार करत फिरत आहे. इतका निर्लज्ज आणि निर्घृण राज्यकर्ता आम्ही पाहिला नाही. बंटेंगे तो कटेंगे, म्हणत ते प्रचार करत आहेत. हम बंटेंगे नही और कटेंगे भी नही. हम 23 तारिखको तुमको फाडेंगे. नरेंद्र मोदी अमित शहा यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. एक हैं तो सेफ हैं, ही त्यांची पोकळ घोषणा आहे. त्यांना सांगायला हवं, तुम्ही महाराष्ट्रात येणं बंद करा, महाराष्ट्र सेफ आहे आणि सेफच राहणार, अशी टीकाही त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List