‘मणिपूर एकही नाही आणि सुरक्षितही नाही’, मल्लिकार्जुन खरगे यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
मणिपूरमधील बेपत्ता सहापैकी तिघांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. आंदोलकांनी शनिवारी मणिपूरमधील तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानांवर हल्ला केला. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘ना मणिपूर एक आहे, ना सुरक्षित आहे’, असे खरगे म्हणाले.
खरगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले आहे. “तुमच्या डबल इंजिन सरकारमध्ये ना मणिपूर एकसंध आहे, ना मणिपूर सुरक्षित आहे. मे 2023 पासून राज्य अकल्पनीय वेदना, विभाजन आणि वाढता हिंसाचार सहन करत आहे. यामुळे येथील लोकांचे भवितव्य उद्धवस्त झाले आहे. भाजप घृणास्पद विभाजनवादी राजकारणाद्वारे जाणूनबुझून मणिपूरला जाळत आहे, असे आपण संपूर्ण जबाबदारीने म्हणत आहोत”, असे खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, “7 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संघर्षग्रस्त प्रदेशांच्या यादीत नवीन जिल्ह्यांची नावे जोडली जात आहेत आणि सीमेवरील ईशान्येकडील राज्यांमध्ये आग पसरत आहे. मणिपूर या सुंदर सीमावर्ती राज्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरला आहात. भविष्यात तुम्ही मणिपूरला गेलात तरी राज्यातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. येथील जनतेला तुम्ही संघर्षमय परिस्थितीत सोडले, त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, हे इथले लोक कधीच विसरणार नाहीत.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List