महाराष्ट्र वाचवण्यासाठी महायुतीचा पराभव करा, कुठल्याही दबावाला, प्रलोभनाला बळी पडू नका; लोकशाहीप्रेमी नागरिकांचे मतदारांना आवाहन
शेतकऱयांच्या समस्या, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नांबाबत अवाक्षर न काढणाऱया भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवणारा प्रचार केला जात आहे. प्रचाराच्या चिंताजनक स्थितीविरुद्ध लोकशाहीप्रेमी नागरिकांनी आवाज उठवला आहे. मतदारांनी कुठल्याही दबावाला व प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे, महाराष्ट्र वाचवण्यासाठी महायुतीचा पराभव करावा, असे आवाहन लोकशाहीप्रेमी नागरिकांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक नागरिक म्हणून अस्वस्थ वाटावे, चिंता वाटावी अशी भयंकर गोष्ट सुरू आहे. भाजपने निवडणुकीची सुरुवात ‘व्होट जिहाद’ वगैरे म्हणून केली. त्यानंतर ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देत धार्मिक द्वेष पसरवत प्रचार केला. मात्र महागाई, महिला असुरक्षितता, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नाबाबत अवाक्षर काढले नाही. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाहीवादी राजकारणाची परंपरा राखण्यासाठी भाजपचा गलिच्छ प्रचार नाकारला पाहिजे. महाराष्ट्र धर्म सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. शिवरायांचा महाराष्ट्र द्वेष नाही तर प्रेम व पराक्रम करायला शिकवतो, याची जाणीव सर्वांनी ठेवावी. लोकशाहीत मतदानाचा मिळालेला अधिकार कुठल्याही दबावाला व प्रलोभनाला बळी न पडता वापरा, भाजपप्रणित महायुतीचा संपूर्ण पराभव करा. महाराष्ट्र वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असे ललित बाबर, उल्का महाजन, डॉ. संजय गोपाळ, प्रा. सुभाष वारे, नितीन वैद्य, मानव कांबळे, इब्राहीम खान, संजीव साबडे आदी लोकशाहीप्रेमी नागरिकांनी म्हटले आहे.
भाजप, महायुतीच्या नेत्यांची विद्रूप भाषा
भाजपच्या नेत्यांनी सामाजिक वीण उसवून टाकण्याचा चंगच बांधला आहे. भाजप व महायुतीच्या नेत्यांनी विद्रूप, ओंगळवाणी भाषा वापरली. महाराष्ट्राला हे विकृतीकरण मान्य नाही, असेही लोकशाहीप्रेमी नागरिकांनी महायुतीला ठणकावले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List