झूट, फूटच्या सरकारने महाराष्ट्राला अनितीचे मॉडेल बनवले
महाराष्ट्राने नेहमी देशाच्या राजकारणाला दिशा दाखवली. रोजगार हमी, महिलांसाठी आरक्षण अशा अनेक योजना इथे यशस्वी झाल्यानंतर देशभरात राबवल्या गेल्या. मात्र गेल्या अडीच वर्षांत झूट, लूट आणि फूटच्या सरकारने महाराष्ट्राला कुनिती व कुकर्माचे मॉडेल बनवले अशी जबरदस्त टीका लोकशाही संमेलनात भारत जोडोच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भारत जोडो अभियानाच्या वतीने लोकशाही, संविधान आणि मताधिकार संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात मार्गदर्शन करताना भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार तडाखे लगावले. ते म्हणाले की, खोट्या राष्ट्रवादीचा आव आणणारे आणि धर्माच्या, जातीच्या नावावर दंगली घडवून आणणारे खरे देशद्रोही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला महाराष्ट्राने सणसणीत चपराक लगावली होती. आता पुन्हा एकदा भाजपला धडा शिकवावा, असेही योगेंद्र यादव यांनी सांगितले.
फडणवीस यांनी विचार, भाषण स्वातंत्र्याचा अपमान केला
भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्र संयोजक उल्का महाजन यांनीही आपल्या भाषणात मिंधे सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच ही योजना राबवली जात असून महिलांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे सरकार सामाजिक व आर्थिक क्षेत्रातही पराभूत झाले आहे. भारत जोडो अभियानात सामील झालेल्या देशभक्तांना अर्बन नक्षल तसेच अराजक माजवणारे असा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस हे विचार आणि भाषण स्वातंत्र्याचा अपमान करीत असल्याचे डॉ. संजय गोपाल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List