महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला
बीकेसीत झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. 10 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.
महाराष्ट्र कॉँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक टिळक भवन येथे रमेश चेन्नीथला आणि कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला म्हणाले, 10 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित असतील.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. भाजपकडून काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात चुकीच्या व अफवा पसरवणाऱया खोटय़ा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रांत ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे, पण भाजप जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
काँग्रेस बंडखोर निलंबित; राज्यात मैत्रिपूर्ण लढत नाही
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
राहुल–प्रियंका यांच्या सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 12, 14 व 16 नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेणार आहेत, तर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या 13, 16 व 17 नोव्हेंबरला प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे 13 ते 18 नोव्हेंबर पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱयावर असून राज्यातील विविध भागांत त्यांच्या सभा होतील. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List