ठसा – मिलिंद विठ्ठल सरनोबत
>> दिलीप हेर्लेकर , महारोगी सेवा समिती (आनंदवन)
महारोगी सेवा समितीसाठी मुंबईत कोणतेही काम असो ते हमखास करणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल ते म्हणजे मिलिंद विठ्ठल सरनोबत. दि. 27 ऑक्टोबर 2024 रोजी अल्पकालीन आजाराने मिलिंद यांचे अकाली निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेली पन्नास वर्षे ते महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन) या संस्थेशी जोडलेले होते. तसेच 2016 पासून विश्वस्त मंडळाचे सदस्य होते.
आपल्या वडिलांनी सुरू केलेला औद्योगिक व्रेन बसवणे व दुरुस्ती हा व्यवसाय जसा मिलिंद यांनी सांभाळला, तसाच आनंदवन-हेमलकसा प्रकल्पांच्या कामाशी जोडलेले नातेही त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवले. या प्रकल्पांसाठीचे कोणतेही काम असले की, कितीही पायपीट करावी लागली तरी करायचीच हा वडिलांचा वारसाही त्यांनी जपला होता. मिलिंद यांनी संस्थेकरिता केलेल्या सगळ्या कामांची यादी करणे खूप कठीण आहे. संस्थेकरिता माहिती देणे असो वा संस्थेच्या प्रकल्पाला भेट द्यायला मार्गदर्शन करणे असो, संस्थेकरिता काही साहित्य खरेदी करणे असो वा आनंदवनाची उत्पादने विकणे असो, या उत्पादनांसाठी ऑर्डर मिळवणे असो वा मुंबईत आलेले ऑर्डरचे सामान संबंधितांना पोहोचवणे असो, अशा पुरवठा केलेल्या सामानाचे बिल वसूल करणे असो वा संस्थेसाठी देणगीचे चेक जमा करणे असो, अशी ही न संपणारी यादी आहे. मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक पेठेत आनंदवन उत्पादनांचा स्टॉल ठेवावा ही वडिलांची कल्पना, पण अमलात आणताना सगळ्या अडचणीतून मार्ग काढला तो मिलिंद यांनी. सुमारे 30 वर्षे आनंदवनचा हा सहभाग होता. तेव्हा रोज रात्री विक्रीची रोख रक्कम आपल्याकडे घेऊन बँकेत जमा करण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली ती मिलिंद यांनी. कोणी कार्यकर्त्याने या कामात हयगय केली तर मिलिंद यांनी त्याला झापलाच म्हणून समजायचे. या प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. मुंबईत ठोक बाजारातून अगदी ग्रिटिंग कार्डाला लागणाऱया वेलव्हेट पेपरपासून ते बनियन, शर्ट वगैरे तयार कपडय़ापर्यंतच्या वस्तूंच्या खरेदीपूर्वी सगळ्या चौकशा करून संस्थेचे पैसे वाचतील व संस्थेला योग्य मोबदला मिळेल याची काळजी घेणारा आघाडीचा कार्यकर्ता म्हणजे मिलिंद. स्वरानंदवनच्या कार्यक्रमांसाठी देणग्या मिळवून पास वितरित करण्याचे काम मुंबईतील अनेकांनी केले आहे, पण अशोक हांडेंच्या सूचनेवरून शासकीय नाटय़ परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळवून आणायचे अवघड कामही मिलिंद यांनीच केले आहे. मुंबईत संस्थेच्या शिवाजी पार्क शाखेतील बँकेचे व्यवहार सांभाळायचे कामही चोखपणे अनेक वर्षे मिलिंद यांनीच सांभाळले आहे. मुंबई परिसरातील 90 टक्के तरी संस्थेच्या वा आमटे कुटुंबाच्या सदस्यांच्या तिन्ही पिढय़ांच्या कार्यक्रमाला हजर असणारा मिलिंद यांखेरीज दुसरा कार्यकर्ता नाही. संस्थेच्या इतिहासात अशी 40 वर्षांपेक्षा अधिक काळ योगदान देणारा ‘हरहुन्नरी कार्यकर्ता’ संस्थेने मिलिंद यांच्या निधनाने काल गमावला आहे यात तिळमात्रही शंका नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List