खोकेबाजांना हटवा; सामान्यांचे सरकार आणा, आदित्य ठाकरे यांचे आवाहन
महाराष्ट्रातील 24 उद्योग गुजरातला पळवण्याचे पाप मिंधे व भाजप सरकारने केले आहे. त्यामुळे युवक बेरोजगार राहिला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मिंध्यांच्या राज्यात महिला असुरक्षित आहेत. अशा खोकेबाज सरकारला हद्दपार करून सामान्य माणसांचे सरकार आणू आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भर चौकात फाशी देण्यासाठी शक्ती कायदा पारित करू, असा वज्रनिर्धार आज शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे कन्नडचे उमेदवार उदयसिंग राजपूत आणि वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ पिशोर आणि शिऊर येथील विराट सभांमध्ये ते बोलत होते.
कन्नड तालुक्यातील पिशोर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत आणि वैजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पिशोर आणि शिऊर येथे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दणकेबाज विराट जाहीर सभा झाल्या.
पिशोर येथील सभेत त्यांनी ठाकरे शैलीत भाजपा व खोके सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू तसेच जीवनावश्यक वस्तू स्थिर ठेवू, बेरोजगारांना चार हजार रुपये रोजगार भत्ता देऊ, जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवू, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भरचौकात फाशी देण्यासाठी शक्ती कायदा पारित करू, लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये मासिक अर्थसहाय्य देऊ.
राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील 24 उद्योग गुजरातला पळवण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो युवक बेरोजगार झाले हे सांगताना त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कोण, हे तुम्हाला माहित आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपस्थितांनी मोठय़ा आवाजात ‘नाही’ असे उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. रोजगार पळवणाऱ्या या सरकारला सत्तेत आणणार का? असा प्रश्न करीत या सरकारला त्यांची जागा दाखवा व आपल्या हक्काचे महाविकास आघाडीला सत्तेत बसवून आपले प्रश्न मार्गी लावू असे ते म्हणाले.
येणाऱ्या वीस तारखेला मशाल चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी उदयसिंग राजपूत यांना निवडून आणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, अवचित नाना वळवळे, युवा सेना जिल्हा युवाअधिकारी उमेश मोकासे, कन्नड तालुकाप्रमुख संजय मोटे, उपतालुकापमुख गोकुळ डहाके, संजय पिंपळे, शिवाजी थेटे, तालुका संघटक डॉ. अण्णा शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, प्रसन्ना पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख विलास पवार, विभागीय सचिव अशोक पटवर्धन, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्रात परिवर्तनासाठी मशाल पेटवा
40 गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून आपले सरकार स्थापन केले. या गद्दारांना निवडणुकीत धडा शिकवा आणि महाराष्ट्रात परिवर्तनासाठी मशाल पेटवा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शिऊर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात पंचसूत्री जाहीर केली आहे.त्यात महिला, शेतकरी व युवकांसाठी प्राधान्य दिले आहे. शेतकरी बांधवांना 3 लाखापर्यंत कर्जमुक्ती,महिलांना दरमहा 3 हजार रुपये, मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार आहे. बेरोजगार तरुणाला 4 हजार रुपये भत्ता महाविकास आघाडी सरकार आल्यावर देणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List