सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचे निधन; दोन दिवसांनी होता वाढदिवस, चाहत्यांना धक्का
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अशा अचानक निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांनी, ती तिचा 25 वा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करणार होती, पण त्याआधी तिने जगाचा निरोप दिला. या दुःखद घटनेची माहिती देण्यासाठी मीशाच्या कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. मीशा तिच्या मजेदार आणि मनोरंजक रील्ससाठी खूप प्रसिद्ध होती. मीशा अग्रवालचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मीशा अग्रवालच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का
मिशा अग्रवालने तिच्या उत्साही शैलीने आणि संबंधित कंटेंटने डिजिटल जगात तिने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. पण तिच्या अशा अचानक जाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या बातमीने तिचे चाहते, मित्र आणि इतर कंटेंट क्रिएटर्संना प्रचंड धक्का बसला आहे.
मीशाच्या कुटुंबाने काय माहिती दिली?
मीशाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, “खूप दुःखाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की मीशा अग्रवाल आता आपल्यात नाही. तुम्ही तिला आणि तिच्या कामाला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही या मोठ्या नुकसानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया मीशाला तुमच्या प्रार्थनेत लक्षात ठेवा आणि तिला तुमच्या हृदयात ठेवा. आमचे दुःख खूप मोठे आहे. ते शब्दात मांडणे कठीण आहे. स्वतःची काळजी घ्या,”
तसेच कुटुंबाने मीशाच्या मृत्यूबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही आणि या कठीण काळात सर्वांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच मीशाच्या कुटुंबाने अद्याप मीशाच्या मृत्यूचे कारण उघड केलेले नाही.
सोशल मीडियावर लोकांनी दुःख व्यक्त केले
या बातमीनंतर सोशल मीडियावर सर्वजण दुःख व्यक्त करत आहेत. चाहत्यांना ही दुःखद बातमी स्वीकारणे खूप कठीण होत आहे. अनेकांनी तर हा विनोद आहे का असा प्रश्नही विचारला. एका युजरने लिहिले आहे की, “हे खूप दुःखद आहे. मीशा खूप हुशार आणि मेहनती होती. तिचे कुटुंब काय अनुभवत असेल याची मी कल्पना करू शकत नाही. खूप प्रेम आणि शक्ती पाठवत आहे,” तर एका युजरने लिहिले आहे की,”ही बातमी ऐकून मन दुखावले. मीशा, तुला माहित असायला हवं होतं की आम्ही सर्वजण तुझ्यावर किती प्रेम करतो! तुला वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी करू शकलो असतो तर बरे झाले असते. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो.” असं म्हणत भावनिक पोस्ट केली आहे. तिने जगातून अचानकपणे घेतलेली ही एक्सिट नक्कीच सर्वांसाठी धक्कादायक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List