“जगाला सांगेन ते माझं बाळ आहे”; लग्नाविना आई बनलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून गेला प्रसिद्ध अभिनेता

लग्नाविना आई होणं ही बाब भारतात अजूनही मोकळेपणे स्वीकारली जात नाही. त्यातही ती व्यक्ती सेलिब्रिटी असली की त्याची सर्वत्र चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सहसा अशा समस्येत अडकलेल्यांची कोणी फारशी मदत करू पाहत नाही. परंतु लग्नाविना आई होणाऱ्या अशाच एका अभिनेत्रीच्या मदतीला एक प्रसिद्ध अभिनेता धावून गेला होता. जगाला सांगेन ते माझंच बाळ आहे, अशी भूमिका त्या अभिनेत्याने घेतली होती. त्या अभिनेत्याचं नाव होतं सतीश कौशिक. अभिनेत्री नीना गुप्ता गरोदर असताना सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी याविषयीचा खुलासा केला होता. नीना या माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या आणि त्यातूनच त्या गरोदर राहिल्या होत्या. परंतु विवियन त्यावेळी विवाहित होते आणि पत्नीला सोडून ते नीना यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते.
अशा कठीण काळात सतीश कौशिक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली होती. “तू काळजी करू नकोस. जर बाळ सावळ्या रंगाचा जन्मला तर ते माझं मूल आहे असं तू थेट म्हण. आपण दोघं लग्न करू, कोणाला कसलाच संशय येणार नाही”, असं ते नीना यांना म्हणाले होते. आत्मचरित्रात नीना यांनी हा खुलासा केल्यानंतर त्यावर सतीश कौशिक यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. “त्यावेळी एका मित्राच्या नात्याने मी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो आणि तिला धीर दिला. मला तिची खूप काळजी होती. ती एकटी पडेल याची मला भीती होती. जेव्हा मी तिला लग्नाची मागणी घातली, तेव्हा ती खूपच भावूक झाली होती. तेव्हापासून आमच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली”, असं ते म्हणाले होते.
विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलंय. नुकतंच तिने मुलीला जन्म दिला. नीना यांनीच मसाबाचं संगोपन केलं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List