‘छावा’ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक; नेमकं काय आहे प्रकरण?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचं बेकायदेशीर प्रक्षेपणप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकमधून 26 वर्षीय विवेक धुमाळ नावाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. moviesprime.xyz ही वेबसाइट ऑपरेट केल्याचा विवेकवर आरोप आहे. याच वेबसाइटवरून ‘छावा’ आणि इतर चित्रपटांचं बेकायदेशीर प्रेक्षपण केलं जात होतं. साऊथ सायबर पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपक देसले आणि कॉन्स्टेबल लहारे यांनी शुक्रवारी विवेकला अटक केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला होता. 2025 मधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. परंतु इंटरनेटवर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लीक झाल्याने त्याचा फटकाही निर्मात्यांना बसला आहे.
‘छावा’ या चित्रपटाच्या 1818 बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या होत्या. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर रांधवन या 26 वर्षीय तरुणाला पुण्यातील दौंड इथून अटक केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या लिंक बेकायदेशीररीत्या इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. आतापर्यंतच्या तपासणीत 1818 बेकायदा लिंक इंटरनेटवर आढळल्या आहेत. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदारांनी तक्रार दिलेल्या 1818 बनावट लिंकपैकी एक लिंक तांत्रिक तपासात आरोपी सागर रांधवन याने प्रसारित केल्याचं निष्पन्न झालं. आरोपीने चित्रपटाच्या होस्टिंगरकडून डोमेन खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. तसंच त्याने एख ॲप तयार केलं होतं. तिथे पैसै भरून ॲप डाऊनलोड करणाऱ्यांना ‘छावा’ आणि इतर नवीन प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता येत होते. याप्रकरणी सागरला न्यायालयात हजर केलं असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे दोन तास 37 मिनिटांचा हा चित्रपट आता तुम्ही मोबाइलवर किंवा घरबसल्या पाहू शकता. ‘छावा’ने जगभरात तब्बल 790.14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर भारतातील कमाईचा आकडा 600 कोटी रुपयांहून अधिक आहे. यामुळे 2025 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List