‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटाच्या वादात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उडी घेतली आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला होता. त्यावरून अनुरागने आता देशातील जात व्यवस्थेवर जळजळीत टीका केली आहे. ‘आता ब्राह्मणांना ‘फुले’ चित्रपटाचा त्रास होतोय. भाऊ, जर जात व्यवस्थाच नाही तर तुम्ही ब्राह्मण का म्हणवता? जर जात व्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले का होते?,’ असा सवाल त्याने केला आहे. अनुरागच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
अनुराग कश्यपची पोस्ट-
‘धडक 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान सेन्सॉर बोर्डाने म्हटलं की मोदींनी भारतातील जात व्यवस्था संपवली आहे. त्याच आधारे तर ‘संतोष’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही. आता ब्राह्मणांना ‘फुले’ चित्रपटाचा त्रास होतोय. भाऊ, जर जात व्यवस्थाच नाही तर तुम्ही ब्राह्मण का म्हणवता? जर जात व्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले का होते? एकतर मग तुमचा ब्राह्मणवादच अस्तित्वात नाही, कारण मोदीजींच्या मते भारतात जात व्यवस्थाच नाही? किंवा सर्वजण मिळून लोकांना मूर्ख बनवतायत. भाऊ, तुम्ही सर्वांनी भेटून एकदाच काय ते ठरवा ना.. भारतात जातीवाद आहे की नाही? लोक मूर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात किंवा वर बसलेले तुमचे बाप ब्राह्मण आहे, ते ठरवा’, अशी संतप्त पोस्ट त्याने लिहिली आहे.
‘माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित होता. भावा, जर या देशात जातीयवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती? आता या ब्राह्मण लोकांना लाज वाटतेय किंवा लाजेनं ते मरतायत किंवा वेगळेच ब्राह्मण भारतात जगतायत ज्यांना आपण पाहू शकत नाहीये, चु*** कोण आहे कोणी तरी समजवावं.’ अशी संतप्त पोस्ट त्याने याआधी लिहिली होती.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचं कार्य यावर ‘फुले’ हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रतीक गांधी हा ज्योतिराव फुलेंच्या आणि पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील ‘महार’, ‘मांग’, ‘पेशवाई’ आणि ‘मनू यांची जातीव्यवस्था’ यांसारखे काही जातीवाचक शब्द बदलण्यास किंवा काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List