आई, आता मी कायमचा झोपणार आहे…, पत्नीच्या त्रासामुळे आईला भावनिक निरोप देत तरुणाने संपवले जीवन
देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. प्रामुख्याने आत्तापर्यंत पत्नीच्या आणि तिच्या कुंटुंबाच्या छळामुळे अनेक मुलांनी आपले जीवन संपवले आहे. अशीच एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना बरेलीच्या आकांक्षा एन्क्लेव्हमधून समोर आली आहे. एका 25 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी पीडित व्यक्तीने एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने आईसाठी शेवटचा निरोप लिहिला होता. या घटनेने संपूर्ण शहराला हादरवून टाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज आर्यन (25) असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून सिमरन हे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या दोघांचे लग्न एप्रिल 2024 मध्ये झाले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही काळानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होऊ लागले. सिमरन अनेकदा तिच्या आईवडिलांच्या घरी जायची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून भांडणे करायची. सिमरनच्या कुटुंबीयांनी राजला आणि त्याच्या कुटुंबाला तुरुंगात पाठवू अशी धमकी देखील दिली होती. त्यामुळे नात्यातील कटुता वाढत गेली.
दरम्यान, काही काळानंतर सिमरने राजविरोधात हुंड्यासाठी छळाचा खटला दाखल केला आणि सोशल मीडियाचा वापर करून त्याला सतत मानसिक त्रास देऊ लागली. एवढेच नाही तर तिने तिच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर धमकीचे संदेश पोस्ट केले – “माझा नवरा रात्री तुरुंगात जाईल!” असे तिने लिहिले होते.
सासरच्या लोकांच्या छळामुळे आणि अपमानामुळे राज निराश झाला होता. मी आता हे सहन करू शकत नाही, असे तो अनेकदा म्हणायचा असे राजचा भाऊ सुरेश याने सांगितले. आणि बुधवारी, त्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. तसेच खोलीत एक सुसाईड नोट ठेवण्यात आली होती. “आई, आता मी कायमचा झोपणार आहे. कृपया मला माफ करा, असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. सोशल मीडिया स्टेटस आणि पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने राजने हे पाऊल उचलले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
पीडित कुटुंबाने सून सिमरन, तिचा भाऊ सागर, तिची आई. वडील आणि बहिणींविरोधात पोलिसात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List