सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती; जयंत पाटील संतापले
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 11 एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, आता 25 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यातच सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या फुले चित्रपटाची सध्या चर्चा होत आहे. या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटात फक्त ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपांचे चित्रीकरण नको. फुले यांनी ब्राह्मण समाजाने केलेल्या मदतीचाही उल्लेख असायला हवा, असे दवे यांचे म्हणणे होते. त्यातच आता सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत.
काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र “फुले” सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता… pic.twitter.com/T5UGUv2JSS
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 10, 2025
सेन्सॉर बोर्डाकडून सूचवण्यात आलेल्या बदलांच्या पत्राची प्रत शेअर करत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाच्या मानसिकेतेवर संताप व्यक्त केला आहे. यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते. याबाबत जयंत पाटलांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काश्मीर फाईल्स, केरला फाईल्ससारख्या प्रोपगंडावर आधारित चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, अस पाटील यांनी पोस्टमध्ये म्हणत संताप व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List