‘विरोधकांनी छातीवर हात ठेवून…’; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया
लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांव जोरदार हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
वक्फ बील पुर्णपणे पास होईल असा विश्वास आहे, सेक्युलर शब्दाचा प्रत्यय बिलातून पाहिला मिळत आहे. मुस्लिम महिलांना वक्फ बोर्डात स्थान मिळणार आहे. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. धार्मिक आस्थांच्या विरोधातही हे विधेयक नाही. मागच्या बीलामध्ये ज्या चुका होत्या, त्यामुळे जमिनी लाटल्या जात होत्या. आता ज्याची ज्याची सदविवेक बुद्धी जागृत आहेत ते या विधेयकांचं स्वागत करतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधक या संदर्भातील एकही पुरावा संसदीय समितीपुढे आणू शकले नाहीत, जेव्हा काहीही उरत नाही त्यावेळी अशा गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी छातीवर हात ठेवून विचार केला तर लक्षात येईल की विरोधी पक्ष मताची लाचारी असल्यामुळे विरोध करत आहेत. मताच्या लांगुनचालनासाठी हे बिलाला विरोध करत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते बिलाला विरोध करणार नाहीत. विधेयकाला समर्थन देतील अशी माझी अपेक्षा आहे. दरम्यान संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्या लेव्हलचे प्रश्न विचारत जा, नाहीतर मला तुमच्या बुद्धीची कीव येते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत असून, संसदेमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List