BJP President – भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? सूत्रांनी दिली माहिती
जगातील सर्वात मोठा पक्ष असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच गेल्या दोन वर्षापासून कायम आहे. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 2023 मध्ये संपला होता. मात्र त्यानंतर त्यांना एका मागोमाग एक मुदत वाढ देण्यात आली होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. पण आता भाजप लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाला याच महिन्यामध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. 4 एप्रिल रोजी संसदीय अधिवेशन संपणार असून त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया वेग घेईल. भाजपच्या स्थापना दिनी किंवा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भाजप नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
भाजपच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 50 टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी बूथ, मंडल आणि जिल्हा पातळीवर निवडणुका पार पडतात. सध्या भाजपच्या 13 राज्यातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह उर्वरित राज्यांसाठी भाजप अध्यक्षांची घोषणा पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया वेग घेईल.
सध्या जे.पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते आणि जानेवारी 2020 मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन 2023 मध्ये त्यांना जून 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र, हरयाणा, झारखंडसह विविध राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांना पुन्हा मुदत वाढ देण्यात आली. मात्र आता ते केंद्रीय मंत्री झाले आहेत, त्यामुळे भाजपला नवीन अध्यक्ष शोधावा लागत आहे. दरम्यान, भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी. पुरंदरेश्वरी यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
भाजपशासित राज्यांत लोकसभेच्या जागा वाढवण्याचा घाट, मतदारसंघ पुनर्रचना दक्षिणेकडील राज्यांच्या मुळावर
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड कशी होती
– भाजपच्या घटनेच्या कलम 19 आणि नियमांमध्ये अध्यक्ष निवडीची तरतूद करण्यात आली आहे
– नॅशनल कौन्सिल आणि स्टेट कौन्सिलच्या सदस्यांमधून इलेक्टोरल कॉलेज तयार केले जाते.
– हे इलेक्टोरल कॉलेज राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करते.
– पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने बनवलेल्या नियमांनुसार निवडणुका घेतल्या जातात.
– निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरावा लागतो.
– अध्यक्ष होण्यासाठी उमेदवार किमान 15 वर्ष पक्षाचा प्राथमिक सदस्य असणे आवश्यक.
– इलेक्टोरल कॉलेजचे किमान 20 सदस्य त्याचे प्रस्तावक असले पाहिजे.
– हे प्रस्ताव किमान 5 राज्यांमध्ये आले पाहिजे, जिथे राष्ट्रीय परिषद निवडणुका झाल्या आहेत
– प्रस्तावावर उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
– नामांकनानंतर मतदान होते आणि त्यानंतर मटपेट्या दिल्लीत आणल्या जातात
– भाजपच्या घटनेतील कलम 20 आणि नियमानुसार पात्र सदस्या प्रत्येकी 3 वर्ष सलग दोन टर्म अर्थात एकूण 6 वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष राहू शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List