तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येत नाही? मग सावध व्हा… नियमित पीरियड्स येण्यासाठी ‘हे’ करा फॉलो
बऱ्याच महिलांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वावरत असताना महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्याही वाढताना दिसून येत आहेत. काही महिलांना वेळेवर मासिक पाळी न येणं, मासिक पाळी वेळेच्या आधीच येणं, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर बऱ्याच दिवस रक्तस्त्राव सुरू रहाणं, एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येणं… अशा मासिक पाळी संबंधित अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. यामध्ये अनियमित मासिक पाळी येणं हे गंभीर आजाराचं लक्षण असण्याची शक्यता आहे. जर तुम्हालाही मासिक पाळी नियमित न येण्याची समस्या असेल तर या लक्षणाला हलक्यात घेऊ नका. यासंबंधित डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि शक्य तितक्या लवकर उपचार सुरू करा. तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सलोनी यांनी यासंदर्भात माहिती देताना असे सांगितले की, वेळेवर मासिक पाळी न येणे हे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच पीसीओएसचे एक मुख्य लक्षण असते. पीसीओएस हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. जो आजार प्रामुख्याने महिलांमध्ये आढळतो. आज वेगवान आयुष्य जगत असलेल्या महिलांमध्ये खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी दिसून येतात. या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार महिलांमध्ये खूप सामान्य जरी वाटत असला तरी वेळीच सावध होणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेळेवर मासिक पाळी न आल्याने वजन वाढणे आणि चेहरा आणि त्वचेवर पुरळ येणे या सारखे लक्षणं दिसू लागतात.
काही महिलांना थायरॉईड या आजारामुळे वेळेवर मासिक पाळी न येण्याची समस्या दिसून येते. जेव्हा महिलेमधील थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा अनियमित मासिक पाळीची समस्या जाणवते. थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नसल्याने महिलांना मासिक पाळी न येणे, वजन वाढणे आणि थकवा जाणवणं यासारखे लक्षणे दिसून येतात. थायरॉईड हा रोग अनुवांशिक कारणांमुळे होतो. तर महिलांमध्ये मानसिक ताण-तणाव हे देखील वेळेवर मासिक पाळी न येण्याचे एक मुख्य कारण असू शकते. याशिवाय, महिलांना वेळेवर पाळी न येण्याचं कारण म्हणजे गर्भाशयाशी संबंधित कोणताही आजार देखील असू शकते.
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी ‘हे’ करा फॉलो
वेळेवर मासिक पाळी येण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला देखील अनियमित मासिक पाळी येत असेल आणि तुम्हाला मासिक पाळी नियमित यायला हवी असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे. रोजच्या आहारात फळे, पालेभाज्या आणि कडधान्ये समावेश करा.
- मासे आणि अक्रोड यांसारखे ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतात.
- नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. दररोज योगा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मानसिक ताण-तणावाची समस्याही उद्भवू शकत नाही.
- दरम्यान, तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळत असतील, तर नियमित तपासणी करून घ्या. यामुळे महिलासंबंधित कोणत्याही आजारावर वेळेवर उपचार करणे शक्य होऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List