राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित केली आहे. ही सभा संध्याकाळी ५ ते १० या वेळेत होणार आहेत. या सभेला महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातून मनसैनिक हजेरी लावतात. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करतात. ही परंपरा गेल्या १९ वर्षांपासून सुरु आहे. आज, देखील राज ठाकरेंची सभा आहे. या सभेत ते कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित करणार आहेत.
2006 मध्ये शिवसेनेपासून फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यापासून राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. या रॅलीचे महत्त्व राजकीयदृष्ट्याही अधिक आहे, कारण मनसेचा आगामी रोडमॅप आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे हे व्यासपीठ ठरते.
गुढी पाडवा मेळावा 2025चा अजेंडा
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात यंदाचा मेळावा आणखी महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली रणनीती स्पष्ट करू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ते मत व्यक्त करून मनसेच्या भविष्यातील योजना जाहीर करतील, अशीही शक्यता आहे. राज ठाकरे हे सातत्याने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करतात.
मुंबई पोलीस आणि प्रशासनाची तयारी
या कार्यक्रमासाठी मुंबई पोलिसांनी विशेष ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे. मनसे समर्थक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर पोहोचण्याची शक्यता पाहता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने रॅलीदरम्यान वाहतूक वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: माहीम कॉजवे ते शिवाजी पार्क हा मार्ग दुपारी 1 नंतर वळवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तुळशी पाईप रोड, दादर कबुतरखानाकडून येणाऱ्या मार्गावरही दिशा बदलण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List