अडवाणी, जोशींसाठी लावलेला वयाचा नियम मोदींना लागू होत नाही का? संजय राऊत यांचा खरमरीत सवाल
वयाची 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणी राहू नये हा मोदींनी केलेला नियम आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच हा नियम लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना लागू केला. मग या नियमांच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? असा खरमरीत सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 2029 ला कोण पंतप्रधान होणार हे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती नाही. 2019 ला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पराभव झालेला आहे. 2019 ला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. त्यानंतर गडबड घोटाळा करून विधानसभा जिंकले हे आख्ख्या जगाला माहित आहे. प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा. स्वतः मोदी यांनी काही नियम केलेले आहेत. ते नियम त्यांना लागू नाही का? वयाची 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणी राहू नये हा मोदींनी केलेला नियम आहे. हा नियम लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना लागू केला. मग या नियमांच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या नियमाची मान्यता होती. आणि याबाबत चर्चा करण्यासाठी ते संघाच्या कार्यालयात गेले होते. नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहेत. आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतं. देवेंद्र फडणवीसांनी कितीही बोलू द्या, हे ते ठरवणार नाहीत. आणि त्यांनी जे सांगितलं आहे की बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही ही मुघल संस्कृती आहे. कोण बाप? कुणाचा बाप. देशाला बाप नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत. ही तात्पुरती व्यवस्था असते. राम आणि कृष्णही यांच अवतारकार्य संपल्यावरही ते गेले. नरेंद्र मोदींचंही अवतारकार्य संपलं आहे त्यांनाही निघून जावं लागेल. लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना शहाजहानप्रमाणे कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना. भाजपचा हा डोलारा लालकृष्ण आडवाणींनी उभा केला. आजचा वैभवशाली भारतीय जनता पक्ष हा दोन जागांवरून सत्तेच्या शिखरावर नेण्याचे काम हे लालकृष्ण आडवाणीसारख्या संघर्षमय नेत्याने केले आहे. आडवाणी यांचा हक्क असताना पंतप्रधानपदाचा फारतर राष्ट्रपतीपदाचा. मोगल संस्कृतीप्रमाणे आडवाणी यांना सत्तेवरून बंदिवान आणि बेदखल केलं. आणि स्वतः मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा आम्ही विचारलं का ही मोगल संस्कृती नाही का? हे राजकारण आहे आणि तुम्ही राजकारण केलंत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही भाजपची मातृसंघटना आहे, आई बाप आहे. 1978 साली या मातृसंस्थेवरून सरकार पडलं आहे. जनता पक्षात अटलजी आणि आडवाणी होते. त्यांनी आपल्या संघावरच्या निष्ठा संपवायला नकार दिला म्हणून सरकार पडलं. त्यामुळे भारतीय राजकारणात संघाचं काय महत्त्व आहे हे देवेंद्र फडणवीसांना मी सांगायला हवं असेल तर ते नकली संघ स्वयंसेवक आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
संघाचे आणि भाजपचे संबंध कसे असायला हवे यावर माझ्यासारख्या बाहेरच्या व्यक्तीने मत व्यक्त करणे हे चूकीचे आहे. पण आतमध्ये काय सुरू आहे यावर माहिती आहे आमच्याकडे. या देशाचं राजकारण उद्धव ठाकरे, शरद पवार करतात. तुम्ही जसे आमच्या घडामोडीचे माहिती ठेवता तसेच तुमच्या अंतर्गत घडामोडीची माहिती आम्हीही ठेवत असतो. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची मुदत संपलेली आहे. तरीही भाजप त्याचे शिखर पुरूष अध्यक्ष नेमू शकलेले नाही कारण अद्याप भाजपला अध्यक्ष नेमायचा आहे त्यात संघाची एक भूमिका आहे. आणि ती भूमिका त्यांना मान्य करावी लागेल असं संघाचं म्हणणं आहे ही आमची माहिती आहे. आता हे नाही म्हणतील पण आमची पक्की माहिती आहे. तसं नसतं तर ताबडतोब नेमला असता. पण नड्डांना मुदतवाढ दिली जातेय. पण पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत, काहीतरी शिजतंय. ते काय शिजतंय ते लवकरच कळेल असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List