दया.. ‘कुछ तो गडबड है’, चोरीला गेलेला जनरेटर दोन वर्षांनंतर ‘प्रकटला’
तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून रात्रीच्या अंधारात दोन वर्षांपूर्वी महाकाय जनरेटर अचानक गायब झाला आणि एकच खळबळ उडाली. हा जनरेटर कोणी चोरला.. त्यामागे नेमके कोण आहे, हे अजूनही गुलदस्त्यात असतानाच गायब झालेला जनरेटर सोमवारी रात्री उशिरा पुन्हा ‘प्रकटला.’ त्यामुळे ‘कुछ तो गडबड हैं’ अशी प्रतिक्रिया वसईतून व्यक्त होत आहे. रात्रीस खेळ करणाऱ्यांना शोधून काढा, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.
एप्रिल 2023 मध्ये वसई तहसील कार्यालयाच्या प्रांगणामधून भलामोठा जनरेटर रातोरात चोरीला गेला होता. विशेष म्हणजे तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्या बदलीनंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करणे गरजेचे होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोर्टनाका विभागप्रमुख दत्ता जाधव यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
गौडबंगाल काय?
गेली दोन वर्षे गायब झालेल्या जनरेटरची चर्चा शहरात सुरू होती. शाखाप्रमुख दत्ता जाधव यांनी आरटीआय अंतर्गतदेखील माहिती मागितली. त्याची सुनावणी प्रलंबित आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी रात्री एक वेगळाच जनरेटर तहसील कार्यालयाच्या आवारात कोणीतरी आणून ठेवला. पूर्वीच्या जनरेटरची छायाचित्रे पडताळून पाहिली असता त्यात फरक जाणवत आहे. त्यामुळे हे नक्की गौडबंगाल काय आहे याची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दत्ता जाधव यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List