मी जिथे राहत नाही तिथे मला काय शोधताय? कामराचा पोलिसांना चिमटा
स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी मुंबई पोलिसांच्या शोधमोहिमेबाबत ‘एक्स’वर पोस्ट केली. ज्याठिकाणी मी मागील दहा वर्षे राहत नाही, तेथे मला काय शोधताय? सरकारी यंत्रणा आणि वेळ वाया कशाला घालवताय? असा टोला कामराने पोलिसांच्या माध्यमातून मिंधे गट आणि महायुती सरकारला लगावला.
खार पोलिसांचे पथक सोमवारी कामराच्या माहीम येथील घरी गेले होते. त्यावर कामराने ‘एक्स’वर पोस्ट केली. ‘गद्दार’ गीताचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर कुणाल कामराच्या मागे कारवाई आणि पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मिंधे गटाने केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलिसांनी चौकशीसाठी कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स बजावले होते. त्यानुसार कामराने सोमवारी पोलिसांपुढे हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र कामरा हजर झाला नाही. त्यामुळे खार पोलिसांचे पथक कामराच्या माहीम येथील घरी पोहोचले होते. तथापि, संबंधित पत्त्यावर कामरा नसल्याने पोलिसांची फेरी फुकट गेली.
मी राहत नसलेल्या पत्त्यावर शोध घेणे हा तुमच्या वेळेचा अपव्यय आहे. यातून सरकारी यंत्रणा वाया घालवली जातेय, अशी पोस्ट कामराने मुंबई पोलिसांना उद्देशून केली. सोबतच त्याने पुद्दुचेरीतील घराच्या बाल्कनीत उभा असलेला पह्टोही शेअर केला. त्यामुळे त्याची पोस्ट मिंधे गट आणि महायुती सरकारला टोला असल्याचे बोलले जात आहे.
घराच्या गेटवर पोलिसांचा फौजफाटा
कामराला आतापर्यंत 500 हून अधिक धमकीचे कॉल्स आले आहेत. त्यामुळे कामरा मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सोमवारी कामराच्या माहीम येथील घराच्या गेट परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस पथक घरी पोहोचले, त्यावेळी तेथे कोणीही कामरा वा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणीही नव्हते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List