राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार
राज्यात गेले काही दिवस नैसर्गिक आणि राजकीय तापमान वाढले आहे. मात्र, येत्या काही दिवसात तापमान घटणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात चंद्रपूर येथे काल पारा ४२ अंशांवर गेला होता. मुंबई आणि परिसरात उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरीही या उष्णतेच्या लाटांनंतर येत्या काही दिवसात पुन्हा तापमानाचा पारा खाली येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुण्यात आकाश ढगाळ राहणार
उष्णतेच्या लाटेनंतर राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकते. मुंबईतील तापमान कमी झालं आहे.राज्यातील मुख्य शहरांमधील हवामानाविषयी जाणून घेऊयात.मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहील. मुंबईतील किमान तापमान 23 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतकं राहील.पूण्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. पुण्यात दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
संभाजीनगरात 19 मार्चला तुरळक सरी बरसणार
कोल्हापूरमध्ये तापमान वाढलं आहे. कोल्हापूरमध्ये किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढचे दोन दिवस आकाश निरभ्र असेल. संभाजीनगरमध्ये 19 मार्चला तुरळक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. संभाजीनगरमधील किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील तापमान घसरणार
नाशिकमध्ये आकाश निरभ्र राहील. नाशिकमधील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं राहील. विदर्भातील उष्णतेचं प्रमाण थोडं कमी होणार आहे. येथील तापमान एक ते दोन अंशांनी घटण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आकाश ढगाळ राहील. नागपूरमध्ये किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस इतकं राहील. धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हलका पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटले आहे.
आरोग्याची काळजी घ्यावी
तापमानात वारंवार बदल होत असल्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी अधिक उन्हात काम करु नये किंवा घराबाहेर पडू नये. तसेच महिलांनी देखील स्वयंपाक सकाळीच उरकावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ज्येष्ठांनी आणि लहान मुलांनी दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाणे टाळावे. तसेच पाणी जास्त प्यावे , असाही सल्ला आरोग्यज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्यात कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना भेटावे असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मुंबईकरांची काहीलीतून सुटका
येत्या आठवड्यात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगराचे तापमान ३३-३४ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली
दरम्यान, सोमवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली असून AQI ९७ वर पोहोचला आहे. शहरातील २१ हवेच्या गुणवत्तेच्या केंद्रांपैकी १३ केंद्रांनी “समाधानकारक” ( ५०-१०० ) AQI नोंदवला आहे.
सर्वोत्तम AQI : बोरिवली पूर्व ( ७८ ), घाटकोपर ( ८० )
सर्वात खराब AQI : चकाला ( ३७ )
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List