काका ओ काका.. काका आहे का गं? वाड्यातील गारगावात कावळ्याची ‘पोपटपंची’
काका ओ काका… काका.. काका.. काका आहे का गं?… बाबा ओ बाबा.. अशी हाक तुम्हाला ऐकू आली तर चक्रावून जाऊ नका.. ही हाक मारतोय चक्क एक कावळा.. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील गारगाव या गावात एका बोलक्या कावळ्याने मुकणे कुटुंबात मुक्काम केला आहे. काव काव करण्याऐवजी घरातील मंडळींना काका, बाबा, आई, ताई अशा नावाने हाका मारत ‘पोपटपंची’ करणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाडा तालुक्यातील गारगाव हे अतिदुर्गम आणि जंगल परिसरातील गाव आहे. या गावात सरगम मुकणे या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एक कावळा पाळला आहे. सरगम जसे हावभाव करतो तसेच हावभाव हा कावळाही करतो. दोन वर्षांपूर्वी एका झाडाखाली सरगमला कावळ्याची दोन पिल्ले सापडली. त्यांना उचलून सरगमने घरी आणली आणि पाळली. त्यातील एका पिल्लाचा मृत्यू झाला. परंतु बचावलेले दुसरे पिल्लू आता दोन वर्षांचे झाले आहे.
बाहेरच्या कावळ्यात तो मिसळत नाही
आता सरगमप्रमाणेच हा कावळाही काका ओ काका.. काका घरात आहेत का.. बाबा, आई, ताई अशा हाका मारतो. बाहेरचे कावळेही त्यांच्या आंगणात येतात. पण हा कावळा मात्र त्यांच्यात मिसळत नाही, अशी माहिती सरगमने दिली. हा कावळा मुकणे कुटुंबातच राहतो. या कावळ्याचा बोलताना व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला आणि सर्वत्र या कावळ्याचा बोलबाला झाला. गेल्या दोन दिवसांपासून पक्षीप्रेमी या बोलणाऱ्या कावळ्याला पाहण्यासाठी येऊ लागल्याची माहिती सरगमने दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List