नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक हुकले, 19 वर्षीय याकूब मेन्सिकने जिंकला मियामी ओपनचा किताब
गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शतकी एटीपी जेतेपदासाठी संघर्ष करत असलेल्या नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक पुन्हा एकदा हुकले. झेक प्रजासत्ताकचा नव्या दमाचा टेनिसपटू याकूब मेन्सिकने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत जोकोविचचा पराभव करत विजेतेपद पटकावत इतिहास घडविला. ही स्पर्धा जिंकणारा याकूब हा सर्वांत तरुण खेळाडू ठरला असून, 19 वर्षीय याकूबचे हे पहिलेच एटीपी विजेतेपद होय.
याकूबने संघर्षपूर्ण अंतिम लढतीत नोव्हाक जोकोविचचा 7-6 (4), 7-6 (4) असा पराभव करून मियामी ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले. त्याला 9 कोटी 40 लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी, मेन्सिकला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शांघाय मास्टर्समध्ये जोकोविचकडून तीन सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मी जोकोविचविरुद्धचा हा सामना खूप घाबरून खेळलो,’ अशी प्रांजळ कबुली याकूबने विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर दिली. जोकोविचने 2007 मध्ये पहिल्यांदा मियामी ओपनचे विजेतेपद पटकावले होते, तेव्हा मेन्सिक हा केवळ 2 वर्षांचा होता. जोकोविचने तब्बल सहा वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. मात्र, याकूबने जोकोविचला पराभवाचा धक्का देत त्याला सातवे जेतेपद मिळू दिले नाही.
जोकोविचला एटीपी जेतेपदाची हुलकावणी
37 वर्षीय नोव्हाक जोकोविच हा मास्टर्स 1000 स्पर्धा असलेल्या मियामी ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने अंतिम सामना जिंकला असता तर त्याचे 100वे व्यावसायिक एटीपी जेतेपद ठरले असते. मात्र, आज अंतिम लढतीत याकूबकडून पराभूत झाल्याने त्याचे हे एटीपी पदकांचे शतक हुकले. जोकोविचने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय जेतीपदे जिंकली आहेत. अमेरिकेचा जिमी कॉनर्स (109) आणि स्वित्झर्लंडचा सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडरर (103) या दोनच खेळाडूंनी आतापर्यंत एटीपी जेतेपदांचा शतकी टप्पा ओलांडला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List