कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ, भाजपच्या 18 आमदारांचं 6 महिन्यांसाठी निलंबन; नेमकं काय घडलं?
शुक्रवारी कर्नाटक विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यादरम्यान, विधानसभा अध्यक्ष यूटी खादर यांनी सभापतींच्या खुर्चीचा अनादर केल्याबद्दल भाजपाच्या 18 आमदारांचे 6 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आल्याचे आदेश जारी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना जाहीर केलेलं 4 टक्के आरक्षण, तसेच सरकारमधील एका मंत्री आणि इतर राजकारण्यांचा समावेश असलेल्या कथित हनी-ट्रॅप प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, ही मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदारांनी सभापतींच्या आसनाजवळ येत घोषणाबाजी केली. याशिवाय भाजप आमदारांनी आरक्षण विधेयकाची प्रत फाडली आणि ती सभापतींच्या दिशेने फेकली. यादरम्यान मार्शलना बोलवण्यात आले, ज्यांनी गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांना सभागृहातून बाहेर काढलं. यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.
यानंतर तात्काळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विधानसभा कामकाज मंत्री यांनी सभापतींच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. जेवणाच्या वेळेनंतर सभागृह पुन्हा सुरू झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष यूटी खादर यांनी सभापतींच्या खुर्चीचा अनादर केल्याबद्दल भाजपाच्या 18 आमदारांचे 6 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आल्याचं जाहीर केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List