पाकिस्तानात केक खाऊन आले, जमीन हडपणाऱ्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जिलबी-फाफडा खाऊ घातला; भाजपचा केमिकल लोचा काय? – संजय राऊत
दिल्लीमध्ये पाकिस्तानी दुतावासामध्ये इफ्तार पार्टी झाली आणि त्याला काही प्रतिष्ठित लोकांना बोलावले होते. या पार्टीला काही माजी मंत्री गेले म्हणून भाजपने आक्षेप घेतला. पण भारतीय जनता पक्षाने दोन गोष्टींवर कधीच आक्षेप घेतला नाही. एक म्हणजे लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद जिन्ना यांच्या कबरीवर श्रद्धांजली वाहून आले त्याला आणि दुसरे म्हणजे देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला खास पाकिस्तानला गेले आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून व खाऊन आले. या दोन्ही गोष्टींवर भाजप किंवा त्यांच्या बाटग्या हिंदुत्ववाद्यांना आक्षेप घेताना पाहिले नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पाकिस्तान दुतावासाने राजधानी दिल्लीमध्ये रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्यासह आयएनएलडीचे नेते अभय सिंह चौटालही उपस्थित होते. यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.
दिल्लीमध्ये पाकिस्तानी दुतावासाच्या कार्यक्रमाला कुणी गेले म्हणून हे लोक तडफडत असतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन येतात. मग इथे एखाद्या पार्टीला गेल्यावर तुम्ही त्यांना जो न्याय लावता तोच न्याय मोदींनाही लावायला हवा. भाजपच्या अध्यक्षांनी यावर अजूनही खुलासा करायला हरकत नाही. तो का करत नाहीत? असा सवाल राऊत यांनी केला.
नागपुरात दंगल नेमकी कुणी घडवली हा संशोधनाचा विषय, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
तुम्ही स्वत: पाकिस्तानमध्ये जाता, त्यांचा केक खाता. ज्या चीनने आपली 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन हडपली, लडाखमध्ये घुसखोरी केली त्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना गुजरातला बोलावून तुम्ही जिलबी, फाफडा खाऊ घालता. त्यांना झोपाळ्यावर बसवता, स्वत: झोके देता, हे चालते का? भाजपची नक्की भूमिका काय आहे, तुमच्या मेंदुतील केमिकल लोचा काय आहे हे देशाला कळू द्या, असा सणसणीत टोलाही राऊत यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List