विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कोचिंग सेंटर्सचे जाचक नियम; देशातील ‘कोटा’ कोचिंग हबला उतरती कळा!
देशातील कोचिंग हब म्हणून ओळखले जाणारे कोटा शहर सध्याच्या घडीला शेवटच्या घटका मोजत आहे. कोटामधील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे या शहराकडे आता अनेकजण पाठ फिरवू लागले आहेत. कोटामध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षांसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. ही घट केवळ कागदावर नसून, कोटा हे शहर आता एकदम ओसाड होऊ लागले आहे.
एकेकाळी कोटा हे शहर प्रचंड गजबजलेले असायचे. सध्याच्या घडीला मात्र शहरामध्ये ओसाड रस्ते, मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहिलेल्या पीजी हॉस्टेल हेच दृश्य दिसत आहे. केवळ इतकेच नाही तर गुंतवणूकदार, बिल्डर आणि विकासकांच्या चेहऱ्यावरही चांगलेच बारा वाजलेले आहेत. परतावा न मिळाल्यामुळे अनेक गुंतवणुकदारांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्याच्या घडीला कोटामधील अनेक इमारतींचे बांधकामही थांबवण्यात आलेले आहे. विकासकांना नवीन विद्यार्थी येत नसल्यामुळे, अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सध्याच्या घडीला अनेक विद्यमान वसतिगृहे मोठ्या प्रमाणात रिकामी झालेली आहेत.
2023-24 या आर्थिक वर्षात, कोटामध्ये विविध कोचिंग संस्थांद्वारे 1,75,351 विद्यार्थी नीट आणि जेईईची तयारी करत होते.
चालू आर्थिक वर्षात, 2024-25 मध्ये, आतापर्यंत ही संख्या 1,22,616 इतकी झालेली आहे.
संख्येत अंदाजे घट अंदाजे 30 आहे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे.
कोटामध्ये अंदाजे 4,500 पीजी वसतिगृहे आहेत. पूर्वी ही सर्व वसतिगृहे विद्यार्थ्यांनी भरलेली असायची. परंतु सध्या मात्र विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 60 टक्क्यांपर्यंत घसरल्यामुळे अनेक वसतिगृहे ओस पडली आहेत.
कोटामध्ये 1,500 हून अधिक मेस आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे, मेस व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List