प्रशांत कोरटकरवर डाटा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे पोलिसांना पत्र
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देतानाच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा समाजाविषयी गरळ ओकणारा नागपूरचा प्रशांत कोरटकर हा गेल्या 22 दिवसांपासून फरार आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तरीसुद्धा अद्याप त्याला अटक झाली नसल्याने गृहखात्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, स्वतःच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट करून कोरटकरने तो मोबाईल पोलिसांकडे दिल्याने तपासात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात यावा, अशी मागणी फिर्यादी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
चिल्लर माणूस असूनही पोलिसांना सापडत नाही?
गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर पळून गेला आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावर आमचा विश्वास आहे. पण हा चिल्लर माणूस त्याचा अंतरिम जामीन फेटाळला तरी अजूनही पोलिसांना सापडत नाही, यावर शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, मोबाईलमधील डाटा डिलीट करून संवेदनशील गुन्ह्यांतील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याच्यावर आणखी एक कलम वाढविणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
कोरटकर अजूनही फरार; तपासावर प्रश्नचिन्ह
प्रशांत कोरटकरने 24 फेब्रुवारीला फोनवरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तसेच मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी कोरटकरविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून कोरटकर फरार आहे. अटकेपासून बचाव करण्यासाठी कोरटकरने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातून दोनवेळा अंतरिम जामीन मंजूर करून घेतला. मात्र, दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे कोरटकरला कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता असून, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये दाखल झाले आहे. पण स्थानिक पोलिसांनाही कोरटकरचा ठावठिकाणा माहीत नसल्याने गृहखात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List